भाजपाचा 45 वा वर्धापन असा होणार

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 05, 2025 16:00 PM
views 89  views

सिंधुदुर्गनगरी : सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा 45 वा वर्धापन दिन ६ एप्रिल रोजी मोठ्या सोहळ्यात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्ह्यातील १४ मंडळ विभागामध्ये स्वतंत्र ऑनलाईन कार्यकर्ता संमेलन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांशी थेट ऑनलाईन संवाद साधणार आहेत. तसेच यानिमित्त प्रत्येक कार्यकर्ता आपल्या घरावर पक्षाचा मोठा झेंडा लावून कुटुंबासह सेल्फी काढणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. 

सिंधुदुर्गनगरी येथील वसंत स्मृती या भाजपच्या जिल्हा कार्यालयात श्री सावंत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यावेळी ओरोस मंडलाच्या अध्यक्षा सुप्रिया वालावलकर, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, भाजपचे नंदू तळवटकर, जिल्हा कार्यालय मंत्री समर्थ राणे, अजय घाडीगावकर, अक्षय दळवी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री सावंत यांनी केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपचे १३२ आमदार निवडून आले आहेत. एकूण मतदानाच्या २६.७७ टक्के मतदान भाजपला झाले होते. एकूण मतदारात एक कोटी ७५ लाख एवढ्या मतदारांनी मतदान केले होते. त्यामुळे भाजप पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता येवून त्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करीत आहेत. त्यामुळे यावर्षीचा ४५ वा वर्धापन दिन आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. हा वर्धापन दिन सोहळ्याच्या रूपाने साजरा होणार आहे, असे सांगितले.

राज्यात १ जानेवारी २०२५ पासून भाजपा सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले आहे. या अभियानांमध्ये भरभरून प्रतिसाद मतदारांनी दिलेला आहे. राज्यात तब्बल दीड कोटी मतदारांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक टक्का वाटा असून दीड लाख मतदारांनी भाजप सदस्य म्हणून आपली नोंदणी केली आहे. जिल्ह्यामध्ये ९२१ मतदान बूथ असून यातील ७०० बुथांची रचना पूर्ण झाली आहे. खा नारायण राणे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, अतुल काळसेकर, प्रमोद जठार, अजित गोगटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात हे चांगले काम झाले आहे, रणजीत देसाई, महेश सारंग, संदीप साटम, श्वेता कोरगावकर, संदीप मिस्त्री आणि १४ मंडळाचे अध्यक्ष यांनी यासाठी मेहनत घेतली आहे. पक्षाच्या नियमानुसार एखाद्या कार्यकर्त्याने स्वतः ५० सदस्य नोंदणी करतानाच शंभर रुपये पक्षासाठी दिल्यास तो सक्रिय कार्यकर्ता संबोधला जातो. त्यानुसार जिल्ह्यात हजारो कार्यकर्त्यांनी काम करीत सक्रिय कार्यकर्ता असल्याचे सिद्ध केले आहे.

योगायोगाने पक्षाच्या ४५ व्या वाढदिवसा दिवशी यावर्षी राम नवमी उत्सव आला आहे. याचा योग साधून हा वर्धापन दिन जल्लोषात साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक मंडळामध्ये एक याप्रमाणे कार्यक्रम होणार आहे. प्रत्येक मंडळात एखाद्या सभागृहात एलईडी टिव्हीद्वारे या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण व अन्य मंत्री उपस्थित राहून थेट कार्यकर्त्यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधणार आहेत. तसेच प्रत्येक कार्यकर्ता आपल्या घरावर पक्षाचा मोठा झेंडा लावून त्यासमोर कुटुंबासह सेल्फी काढणार आहे. आपल्या पक्षावर विश्वास दाखवून जिल्ह्यात दीड लाख मतदारांनी आपली नोंदणी भाजप सदस्य म्हणून केलेली आहे. त्यांच्या विश्वासाला कधीही तडा लागू दिला जाणार नाही. सामाजिक बांधिलकी राखत पक्ष यापुढेही काम करेल, असे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शेवटी सांगितले.

या ठिकाणी होणार कार्यक्रम

सावंतवाडी आणि आंबोली या दोन्ही मंडळाचा कार्यक्रम सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे होणार आहे यासाठी पुखराज पुरोहित, महेश सारंग मार्गदर्शन करणार आहेत. बांदा मंडळाचा कार्यक्रम बांदा ग्रामपंचायत येथे होणार असून श्यामकांत काणेकर आणि श्वेता कोरगावकर मार्गदर्शन करणार आहेत. वेंगुर्ला मंडळासाठी वेंगुर्ला भाजपा कार्यालय येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाला श्रीकृष्ण परब, मनीष दळवी, प्रसन्ना देसाई मार्गदर्शन करणार आहेत. दोडामात साठी थोडा मग भाजप कार्यालय येथे होणाऱ्या कार्यक्रमात विजयकुमार मराठे, यशवंत आठलेकर, राजेंद्र म्हापसेकर मार्गदर्शन करणार आहेत. कुडाळ मंडळाचा कार्यक्रम हॉटेल लाईन लाईट हॉल येथे होणार असून यावेळी राजू राऊळ, रणजीत देसाई मार्गदर्शन करणार आहेत. पोरस मंडळाचा कार्यक्रम सिंधुदुर्ग नगरी येथील भाजपा कार्यालयात होणार असून जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत मार्गदर्शन करणार आहेत. मालवण शहराचा कार्यक्रम मालवण भाजपा कार्यालय येथे होणार असून भाऊ सामंत, अशोक सावंत मार्गदर्शन करणार आहेत. मालवण ग्रामीण चा कार्यक्रम आळी ग्रामपंचायत येथे होणार असून महेश मांजरेकर, बाबा परब मार्गदर्शन करणार आहेत.

कणकवली कार्यक्रम प्रहार भवन येथे होणार असून मिलिंद कुलकर्णी, संदेश सावंत मार्गदर्शन करणार आहेत. कणकवली ग्रामीण कार्यक्रम लोरे येथील प्रकाश राणे घराण्याची होणार असून प्रमोद रावराणे, मनोज रावराणे मार्गदर्शन करणार आहेत. वैभववाडी चा कार्यक्रम वैभववाडी भाजपा कार्यालयात होणार असून भालचंद्र साठे, दिलीप रावराणे मार्गदर्शन करणार आहेत. देवगड भाजपा कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला काका ओगले, संदीप साटम मार्गदर्शन करणार आहेत. पडेल विभागाचा कार्यक्रम पडेल भाजपा कार्यालयात होणार असून यावेळी माजी आमदार अजितराव गोगटे, बाळा खडके मार्गदर्शन करणार आहेत, असे श्री सावंत यांनी सांगितले.