
सिंधुदुर्गनगरी : भाजप पक्ष विरोधी कारवाया केल्या म्हणून कुडाळ नगरपंचायतीच्या त्या ६ नगरसेवकांचे भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून आपण त्यांचे पक्षातून निलंबन केले आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून या पक्षाला घटनात्मक चौकट आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय आपण घेतला आहे व पक्षाच्या घटनात्मक तरतुदीनुसार हा निर्णय योग्य आहे व या निर्णयावर आपण ठाम आहोत अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ नगरपंचायतीच्या त्या सहा नगरसेवकांची पक्षातून निलंबनाची केलेली कारवाई योग्यच आहे. पक्ष विरोधी कार्यवाही या सहा नगरसेवकांकडून झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून ही कारवाई झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा पदाधिकारी, मंत्री, महामंत्री, राज्याचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निलंबनाचा हा निर्णय झाल्याचे यावेळी बोलताना प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाला घटनात्मक चौकट आहे. भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाची जबाबदारी व अधिकार संघटनेने दिलेले आहेत. पक्षाला घातक ठरेल असे कृत्य झाले तर त्यांच्यावर कारवाई होतेच. मागील निवडणुकीतही अशा कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर पक्षाने कारवाई केली होती. भाजपचे केंद्रीय नेते विद्यमान खासदार नारायण राणे हे पक्षाचे केंद्रीय स्तरावरील नेते आहेत. राष्ट्रीय पातळीवर नेत्यांशी त्यांचा वावर आहे. त्यामुळे या नगरसेवकांवर पक्षातून निलंबनाची केलेली कारवाई योग्यच असल्याचे प्रभाकर सावंत यांनी सांगितले.