सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार असणाऱ्या लाडक्या भावांसाठी भाजपच्या रणरागिणी मैदानात उतरल्या आहेत. जिल्ह्यातील तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त करताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर विजयाचा चौकार मारणार असल्याचा विश्वास भाजप महिला अध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांनी व्यक्त केला. महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठीचा निर्धार नारीशक्तीकडून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.येथील आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
सौ. कोरगावकर म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक स्तरावर कर्तृत्व गाजवत आहे. महाराष्ट्र गेल्या अडीच वर्षांत कार्यरत महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लोकांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. राज्यातील मुलाच्या जन्मापासून वयोवृद्धापर्यंत तसेच शेतकरी, मजूर, महिला यांच्या उन्नतीसाठी झटत आहेत. समाजातील सर्व घटकांचा सन्मान करणार सरकार पुन्हा राज्यात स्थापन होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
तसेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रश्न व समस्या दीपक केसरकर यांना अवगत आहेत. अनेक विकासकामे युती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झाली आहेत. केसरकर यांनी ती मार्गी लावली आहेत. लाडक्या बहीणीसाठी सरकारने राबविलेल्या अभियानाला मताच्या रूपाने उतराई होण्याचा निर्धार करावा असे आवाहन त्यांनी केले. तर भाजप महिला मोर्चाच्यावतीने महायुतीच्या विजयाचा निर्धार करण्यात आला. याप्रसंगी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस शर्वाणी गावकर, जिल्हा चिटणीस मिसबा शेख, वृंदा गवंडळकर, रूपाली शिरसाट, सुजाता पडवळ, प्राजक्ता केळुसकर, समृद्धी विर्नोडकर, राखी कळंगुटकर, ज्योती मुद्राळे, गौरी पावसकर, सुकन्या टोपले, स्मिता पेडणेकर, श्रृती सावंत आदी उपस्थित होते.