
सावंतवाडी : गेळे जमीन प्रश्नाबाबत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी खो घालून गावावर अन्याय केला. हे एक प्रकारचे पाप असून त्यांनी नेहमी खोटे बोलून या विषयाचे राजकारण केले असा आरोप गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी केला. तसेच कॉन्ट्रॅक्टर आणि कार्यालयात बसणाऱ्यांची आमचे नेते संदीप गावडे यांच्याबाबत बोलण्याची उंची नाही असा हे टोला त्यांनी हाणला. आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते.
ते म्हणाले, कावळशेत जागेच्या बदल्यात जिल्हा परिषदेची अन्य जागा गेळे गावाला देण्यात आली आहे असे वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केले. परंतु जिल्हा परिषदेची जागा गेळे गावामध्ये कुठेही नाही. तशा प्रकारचा पुरावा तलाठ्याच्या अहवालामध्ये कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे मंत्री केसरकर यांनी चुकीचा गैरसमज पसरवून ग्रामस्थांची दिशाभूल करू नये. मंत्री केसरकर यांनी आजपर्यंत गेळेगावच्या जमीन प्रश्नी चुकीची माहिती देऊन ग्रामस्थांमध्ये गैरसमज पसरवल्याबाबत आमच्याकडे अनेक पुरावे आहेत. वेळप्रसंगी आम्ही ते सादर करू. परंतु, त्यांनी या प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करत गेळे गाववर केलेले हे खूप मोठे पाप आहे. त्याचे भोग ग्रामस्थ म्हणून आम्ही आज भोगत आहोत.
दरम्यान, गेळे जमीन प्रश्न हा राजकीय विषय नसून आमच्या जीवनाचा प्रश्न आहे. कोणीही या विषयांमध्ये राजकारण आणल्यास आम्ही ते कदापिही खपवून घेणार नाही. गेळे जमीन प्रश्नावर उत्तर देण्यासाठी गावाने समिती नेमली असून त्यामध्ये सरपंच म्हणून मी स्वतः संदीप गावडे व अन्य काही जणांची नेमणूक करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं. यावेळी ग्रामस्थ महेश गवस उपस्थित होते.