भाजपा राबविणार मतदार चेतना अभियान

प्रसन्ना देसाई यांच्यावर जिल्हा संयोजनाची जबाबदारी : प्रभाकर सावंत
Edited by: दिपेश परब
Published on: August 19, 2023 18:05 PM
views 94  views

वेंगुर्ला :  'चेतना' म्हणजेच 'कार्यात्मक जागरूकता' हाच उद्देश समोर ठेवत देशातील युवा पिढीला देश विकासाच्या मुख्य प्रवाहात, निर्णय प्रक्रियेत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या संकल्पनेनुसार संपूर्ण देशात मतदार चेतना अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे आणि त्याचे नियोजन पूर्ण झाल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले आहे. 

या अभियानांचे संयोजक प्रसन्ना देसाई, सह संयोजक रणजित देसाई, लिगल सेलचे ऍड राजेश परुळेकर, आय टी संयोजक केशव नवाथे, सोशल मिडीया संयोजक समीर प्रभुगांवकर हे विधानसभा समितीच्या साथीने

निवडणूक निर्णय अधिकारी, बुथ पातळीवरील अधिकारी (BLO) यांना सर्वतोपरी सहयोग देत मतदारसंघात युवा मतदार वर्गात चेतना निर्माण करतील. या अभियानाचा ऊद्देश म्हणजे देशातील युवावर्गाला मतदानाच्या प्रवाहात सामील करत कुणीही मतदान प्रक्रियेत वंचित राहू नये यासाठी प्रयत्न, बोगस व मयत नोंदी कमी करून मतदानाची पारदर्शकता वाढण्यास मदत, मतदार यादीतील नावे, पत्ते बदलले असल्यास प्रशासनास मदत करत, योग्य नोंद/बदल करून मतदानाचा टक्का वाढण्यास मदत करणे अशी आहेत.  

या अभियानांतर्गत मतदार संपर्क होऊ शकेल आणी मतदारांमध्ये जागरूकता वाढीस लागेल जेणेकरून कर्तव्यभावना निर्माण होत मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल.  

'भाजपाची प्रशासनास मदत करण्याची कार्य पद्धती'

केंद्रीय मंत्री मा. नारायणराव राणे, पालकमंत्री रविन्द्र चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने अनेक पक्षीय अभियाने यशस्वी केलेली आहेत. सिंधुदुर्ग भाजपा प्रशासनास विधानसभा निहाय मदत व्हावी या हेतूनेच एक समिती गठीत केलेली आहे, सदर समिती प्रशासनाशी समन्वय राखत योग्य माहीती देऊन मदत करतील आणि जनजागृतीचे काम करेल असेही प्रभाकर सावंत यांनी सांगितले आहे. 

कणकवली विधानसभेत आमदार नितेश राणे, कुडाळ विधानसभेत निलेश राणे 

सावंतवाडी विधानसभेत राजन तेली यांनी विधानसभा क्षेत्रात बूथ सक्षमीकरण आणि नवमतदार नोंदणी कार्यक्रमाला अपेक्षित गती दिलेली आहे. पंतप्रधानांच्या स्वप्नातील प्रगतीशील भारत साकारण्यासाठी मतदार चेतना अभियान गरजेचे आहे. ते यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील शैक्षणिक,सामाजिक संस्थांनी आणि नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेने या अभियानात सामील व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व अभियान संयोजक प्रसन्ना देसाई यांनी केलेले आहे.