
दोडामार्ग : साटेली - भेडशी उपसरपंच व इतर काही पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे स्थानिक राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. तालुका भाजपावर आणि या पक्षांतर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर थेट आरोप करत जोरदार शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा तालुका पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना खोटी माहिती देऊन प्रवेश करणे थांबवावे, अन्यथा येत्या आठ दिवसात आम्हालाही निर्णय घ्यावा लागेल असा स्पष्ट इशाराच शिंदे शिवसेना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख प्रेमानंद देसाई यांनी तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
दोडामार्ग येथील शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या दोडामार्ग तालुका पदाधिकाऱ्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले. यावेळी सोबत युवा सेना तालुकाप्रमुख भगवान गवस, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, अमर राणे व गुरुदास सावंत उपस्थित होते. देसाई म्हणाले, वर्षभरात तिसऱ्यांदा राजकीय पक्ष बदलणाऱ्या साटेली-भेडशी येथील उपसरपंचांनी नुकताच भाजपात प्रवेश केला. यापूर्वी ते ठाकरे शिवसेनेतून शिंदे गटात आले होते आणि आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री नितेश राणेंना चुकीची, अपूर्ण व खोटी माहिती देऊन साटेली भेडशी उपसरपंच यांचा पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला. जर मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांना अशा फसव्या मार्गाने भाजपात प्रवेश दिला जात असेल, तर हा अत्यंत चुकीचा आणि धोकादायक पायंडा आहे.
एका वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या उपसरपंचांचा राजकीय प्रवास केवळ स्वार्थासाठी असल्याची शक्यता प्रेमानंद देसाई यांनी जोरदार शब्दांत मांडली. या नेत्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा उपयोग करून राजकीय फायदा मिळवण्यासाठीच हा पक्षांतराचा मार्ग स्वीकारला असावा किंवा यामागे त्यांचे वैयक्तिक स्वार्थ असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा आरोप ही श्री देसाई यांनी केला.
पक्ष बदलणाऱ्यांचा दृष्टिकोनच संशयास्पद!
साटेली-भेडशी येथील अनधिकृत बांधकामे पाडणे व इतर कामांसाठी त्यांनी जिल्हाप्रमुख संजु परब यांच्याकडे सहकार्य मागितले होते आणि त्यांना संपूर्ण सहकार्यही देण्यात आले. त्यामुळे त्यांनी सहकार्य न मिळाल्याचा आरोप करणे केवळ आपल्या अपयशावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आहे. भाजप प्रवेशाच्या निमित्ताने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला जात असल्यावरूनही प्रेमानंद देसाई यांनी टीका केली. शिवसेना हा मुळातच हिंदुत्ववादी पक्ष आहे. या पक्षात वर्षभर राहूनसुद्धा जर कोणाला हिंदुत्व आहे की नाही हेच कळत नसेल, तर त्यांचा दृष्टीकोनच संशयास्पद आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केली. तालुक्यातील अनधिकृत मदरसा हटवण्याच्या कारवाईवेळी शिंदे गटाचे पदाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते, याची आठवणही देसाई यांनी करून दिली. जर आम्ही पाठिंबा दिला नसता, तर ती कारवाईच झाली नसती असे त्यांनी सांगितले.
भाजपने पक्षांतरणाचे राजकारण थांबवावे
त्यांनी पुढे इशारा दिला की, भविष्यात असा प्रकार होऊ नये यासाठी वरिष्ठांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. आम्ही वरिष्ठांच्या सूचनेनुसार मित्र पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्याला शिंदे शिवसेनेत प्रवेश देत नाही. त्यामुळे जर शिंदे गटातील कोणी भाजपात जात असेल, तर त्याची संपूर्ण जबाबदारी स्थानिक भाजप तालुका पदाधिकाऱ्यांची असेल. आपल्याच मित्र पक्षांतील कार्यकर्त्यांना फसवून प्रवेश देणे हा मित्रधर्माला हरताळ फासणारा प्रकार आहे. आठ दिवसांत भाजपा तालुका पदाधिकाऱ्यांनी आपले आचरण सुधारावे, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील असा गर्भित इशाराही श्री देसाई यांनी दिला.