सिंधुदुर्गनगरी : शिवसेना पक्षाने मंगळवारी कुडाळ, सावंतवाडी तालुक्यात भाजपला जोरदार धक्का दिला आहे. सिंधुदुर्गनगरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात ओरोस मंडळातील भाजपच्या १८ सरपंच, १२ शक्ती केंद्र प्रमुख तसेच सावंतवाडी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांनी आ निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी भगवी शाल घालीत या सर्वांचे पक्षात स्वागत केले.
कुडाळ तालुक्यातील ओरोस मंडळाचा शिवसेना कार्यकर्ता मेळावा मंगळवारी सिंधुदुर्गनगरी येथील श्री इच्छापूर्ती कार्यालयात आ निलेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पक्ष प्रवेशाचा जाहीर कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, जिल्हा संघटक संजू परब, महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, युवती जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, दादा साईल, किसन मांजरेकर, रुपेश पावसकर, उपजिल्हा प्रमुख राजा गावडे, आनंद शिरवलकर, बबन शिंदे, कुडाळ माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, विनायक राणे, योगेश तुळसकर, अरविंद करलकर, राजा गांवकर, हरेश पाटील, दीपक नारकर, किशोर मर्गज, विलास साळसकर, जिल्हा प्रवक्ते श्री जोशी आदी उपस्थित होते.
पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, देवेन सामंत, दीपक नारकर, कुडाळ माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्यासह ओरोस मंडळातील अठरा सरपंच आणि बारा शक्ती केंद्र प्रमुख यांचा समावेश आहे. या प्रवेशामुळे ओरोस मंडळातील भाजपची ताकद शिवसेनेने कमी केली आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी बोलताना ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल यांनी, हा पक्ष प्रवेश करताना मनात कोणतीही खंत नाही. दडपण नाही. कारण आम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत. शिवसेना आणि भाजप एकत्र आहेत, असे सांगितले.
सावंतवाडीत सुद्धा खिंडार
यावेळी जिल्हा संघटक संजू परब यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तालुक्यातील असंख्य सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आ निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी त्यांचे भगवी शाल घालून स्वागत केले. यामध्ये इन्सुली, मडूरा, शेर्ले, भालावल मधील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य यांचा यांचा समावेश आहे. यावेळी बोलताना संजू परब यांनी, भविष्यात सावंतवाडी तालुक्यात सुद्धा मोठे पक्षप्रवेश केले जातील. आज विद्यमान पाच सरपंच व पदाधिकारी यांनी आज प्रवेश केला आहे. जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांना घेवून प्रत्येक गावात आम्ही बैठक घेणार आहोत. तेथे पक्षप्रवेश घेणार आहोत. त्यानंतर आ निलेश राणे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेणार आहोत, असे सांगितले.
शिवसेना पक्षात येणाऱ्या सर्वांचे आम्ही स्वागत करतो. येणाऱ्यांचा मान सन्मान राखला जाईल. मी आमदार असलो तरी तुमचा आहे. त्यामुळे तुम्हीच आमदार आहात. पाच वर्षे मी तुमची सेवा करणार आहे. निवडून दिलेल्या जनतेच्या परतफेडीसाठी काम करणार आहे, असे सांगितले.