रखडलेल्या सेल्फी पॉईंटची सीओंना करून दिली भाजपनं आठवण !

वर्ष होऊन गेले तरी सेल्फी पॉईंटचे काम अपुर्ण !
Edited by: विनायक गांवस
Published on: April 21, 2023 16:52 PM
views 555  views

सावंतवाडी : शहरातील मोती तलावाच्या बोट क्लबच्या कट्ट्यावरील सेल्फी पॉईंटचे काम अपूर्णावस्थेत आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी करत शहर भाजपनं मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना आठवण करून दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात, तसेच काही ठिकाणी ग्रामिण भागातही सेल्फी पॉईंटचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतू या बाबीस एक वर्ष होऊन गेले तरी सावंतवाडी शहरातील सेल्फी पॉईंटचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. याकामी लक्ष घालून हे काम नगर परिषदेमार्फत पूर्ण करण्यात यावे व सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी भाजीविक्रेते व फळ विक्रेते बसून व्यवसाय करीत असल्याने वाहनांच्या पार्किंगबाबत फारच गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांना पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत नगरपरिषदेने कारवाई करून पार्किंगची जागा सुनिश्चित करुन मोकळी करुन द्यावी, अशी मागणी महिला शहराध्यक्ष, मोहिनी मडगावकर, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली आहे. शहरात विविध ठिकाणी अपूर्णावस्थेत असलेली कामे नगरपरिषदेने पूर्ण करावी, अशी मागणी केली आहे.