
सावंतवाडी : संदीप गावडे यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पडतात हे हरघर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून समोर आले. त्यांनी केलेल्या यशस्वी नियोजनामुळेच या अभियानामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नंबर राज्यात प्रथम आला. त्यांचे काम आणि कार्य पाहता भविष्यात ते निश्चितच वेगळी उंची गाठतील अशा शब्दात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी श्री. गावडे यांचे कौतुक केले.भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व संदीप गावडे आयोजित सुंदरवाडी दहीहंडी उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, युवा नेते संदीप गावडे, संदीप गावडे यांच्या मातोश्री सौ सुनीता गावडे, वडील एकनाथ गावडे,सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, पंकज पेडणेकर, दिलीप भालेकर, शेखर गावकर, शर्वाणी गावकर, शितल राऊळ आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील आरपीडी हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित या सुंदरवाडी दहीहंडीचे उद्घाटन सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करून करण्यात आले. तर नंतर दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध स्तरावर काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सत्कार संदीप गावडे यांच्या माध्यमातून करण्यात आला. उद्घाटनानंतर या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना जिल्हा बँक उपाध्यक्ष श्री काळसेकर म्हणाले, संदीप गावडे हे उभरते नेतृत्व असून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रेरणेतून ते पक्षाचे कार्य करत आहेत. त्यांचे सामाजिक काम पाहता पंचायत समिती सदस्य पदी त्यांना जनतेने बहुमताने निवडून दिले होते. आज त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांच्या विभागातील बहूतांशी ग्रामपंचायतीचे सरपंच ते निवडून आणू शकले येणाऱ्या काळात याच कामाच्या जोरावर ते निश्चितच राजकारणात मोठी उंची गाठतील असा विश्वास व्यक्त केला.