६० वर्षांच्या सत्तेला भाजपकडून सुरुंग !

Edited by: विनायक गांवस
Published on: July 13, 2024 15:04 PM
views 126  views

सावंतवाडी : रामानंद शिरोडकर यांच्या अधिपत्याखाली असलेल्या व यापूर्वी एकदाही निवडणूक न झालेल्या गेल्या ६० वर्षांतील संस्थेतील एक हाती सत्तेला भाजपने सुरूंग लावला. श्री सहकारी ओवळीये ग्रामस्वराज्य संस्था ओवळीये संस्थेच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलने मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. संस्थेच्या सात पैकी सात जागा जिंकत भाजपने एकतर्फी यश संपादन केले. भाजप विरोधात उबाठा सेनेसह सर्व पक्ष एकवटलेले असताना देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीला यश आले. 

श्री सहकारी ओवळीये ग्रामस्वराज्य संस्था ओवळीये विविध कार्यकारी सोसायटीच्या  ४ जागांसाठी शनिवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी राजन राणे व राजन अरविंदेकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या 

या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत पॅनलचे महादेव धोंडी देसाई, जगन्नाथ शिवराम सावंत, रत्नदिप लिंगोजी सावंत व सखाराम महादेव सावंत हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. तर यापूर्वी भाजप पुरस्कृत पॅनलचे चंद्रकांत कृष्णा नाईक, नेहा नंदकिशोर सावंत व लाडू कृष्णा जाधव हे ३ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे सात पैकी सात संचालक भाजप पुरस्कृत पॅनलचे निवडून आले असून भाजपने एकतर्फी सत्ता हस्तगत केली आहे. याबाबतची माहिती ग्रामस्वराज्य पॅनलचे प्रमुख सागर सावंत यांनी दिली.

 या विजयानंतर जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांनी विजयी उमेदवार तसेच भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हा बँक संचालक तथा भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष रवी मडगावकर, माजी जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, बांदा मंडल सरचिटणीस मधुकर देसाई, ग्रामस्वराज्य पॅनलचे प्रमुख सागर सावंत, खरेदी-विक्री संघ संचालक आत्माराम गावडे, बाळू शिरसाट, मनोज सावंत,  भिवा सावंत, हनुमंत सावंत, संतोष सावंत, बाळकृष्ण सावंत, विष्णू सावंत, चंद्रकांत राऊळ, हनुमंत सावंत, भाऊ सावंत,सचिव रमेश सावंत आदी यावेळी उपस्थित होते.

ओवळीये संस्थेवर निवडून आलेल्या भाजप पुरस्कृत पॅनलच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांच्या हितासाठी व  विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतील. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग व रवींद्र मडगावकर यांनी दिली.