रेडी माऊली मंदिर विकासकामाला निधी देता आल्याबद्दल भाग्यवान समजतो : पालकमंत्री रविंद्र चव्हाण

रेडीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या माध्यमातून प्रयत्न : निलेश राणे
Edited by: दिपेश परब
Published on: March 09, 2024 15:14 PM
views 69  views

वेंगुर्ले : रेडी श्री देवी माऊली मंदिर विकास कामासाठी गावातील सर्व ग्रामस्थांची सातत्याने मागणी होती. जिल्ह्यातील रेडी हा भाग निसर्गाच्या सानिध्यात व संपन्न भाग आहे. याठिकाची देवस्थाने महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.  पर्यटनाच्या दृष्टीने मोठ्याप्रमाणात पर्यटक याठिकाणी येत असतात. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हा निधी देता आला याबद्दल मी भाग्यवान समजतो असे प्रतिपादन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी रेडी येथे ऑनलाईन उपस्थितीच्या माध्यमातून केले. येथील सुमारे ५ कोटी रुपयांच्या श्री देवी माऊली मंदिर अन्नछत्र, सभागृह, भक्तनिवास इमारत व मंदीर परिसर सुशोभिकरण या कामाच्या भूमिपूजन समारंभावेळी पालकमंत्री चव्हाण बोलत होते. 

     रेडी येथील प्रसिद्ध श्री माऊली मंदिराच्या विविध विकास कामांचा शुभारंभ होत असताना या धार्मिक स्थळाला अजूनही मोठे नावलौकिक प्राप्त होणार आहे. भाजपच्या माध्यमातून रेडी गाव विकासाच्या पटलावर घेण्यासाठी येथील माजी सभापती प्रितेश राऊळ आणि सरपंच रामसिंग राणे हे दोघे अतिशय मेहनत घेत आहेत. रेडीवासियांनी प्रत्येक वेळी साथ देऊन त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. कारण विकास कामे मंजूर करून त्यांना निधी उपलब्ध करणे सोपे नसते. त्यासाठी खूप पाठपुरावा करावा लागतो. या दोघांच्या कामाबद्दल खरोखरच कौतुक आहे असे सांगून रेडी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत आणि करणार आहोत असे प्रतिपादन यावेळी माजी खासदार तथा कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी 

     आज १० मार्च रोजी हा भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या ऑनलाईन उपस्थितीत व माजी खासदार तथा भाजप कुडाळ विधानसभा मतदार संघ प्रमुख निलेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी आमदार तथा भाजप सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, माजी जि.प. सभापती प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे, श्री देवी माऊली देवस्थान विश्वस्त संदीप राणे, भानुदास राणे, प्रकाश कामत, सरपंच संघटना अध्यक्ष पप्पू परब, आर्किटेक्चर नंदन सावंत, सार्वजनिक बांधकाम अभियंता श्री भगत, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, वसंत तांडेल, भूषण सारंग, शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे, रेडी ग्रा.प.सदस्य, भाजप पदाधिकारी व रेडी ग्रामस्थ उपस्थित होते.

      यावेळी पुढे बोलताना माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे रेडी गावावर विशेष प्रेम आहे. आजपर्यंत त्यांच्या माध्यमातूनही अनेक कामे मार्गी लागली आहेत. आता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही या नूतन कामाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. रेडी वासियांनी भाजपाच्या माध्यमातून होत असलेल्या या विकासाला अधिक गतिमान करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांना साथ द्यावी असे आवाहन निलेश राणे यांनी केले.

    यावेळी बोलताना माजी आमदार राजन तेली म्हणाले की, रेडी येथील माऊली देवस्थानच्या भक्तनिवास व सुशोभीकरण कामानंतर हे स्थळ एक मोठं धार्मिक स्थळ म्हणून अजून प्रसिद्ध होणार आहे. हा विकासाचा रथ भाजपाच्या माध्यमातून असाच पुढे पुढे जाण्यासाठी सर्वांनी सोबत रहा असे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रितेश राऊळ यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच रामसिंग राणे यांनी करत भरगोस विकास निधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.