डेगवेत दुचाकीस्वारावर वाघाचा हल्ला

Edited by:
Published on: December 08, 2024 11:04 AM
views 196  views

सावंतवाडी : डेगवे - वराडकरवाडी येथे वाघाच्या हल्ल्यात डेगवे ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई (४२), त्यांची पत्नी सौ. वर्षा (३६) व मुलगा समर्थ (१०) हे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. राजेश देसाई यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

राजेश देसाई हे शुक्रवारी संध्याकाळी पत्नी व मुलग्यासमवेत दुचाकीने मळगाव येथे जत्रोत्सवाला गेले होते. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घरी परतत असताना वराडकरवाडी येथे पट्टेरी वाघाने त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला. या हल्ल्यात राजेश देसाई यांच्यासह पत्नी व मुलगा रस्त्यावर कोसळले. त्यांच्या मागोमाग अन्य दुचाकी आल्याने वाघाने जंगलाच्या दिशेने पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात राजेश देसाई यांच्या हाताला गंभीर इजा झाली. तसेच पत्नी व मुलगाही जखमी झाले.या घटनेची माहिती मिळताच भाजप सरचिटणीस मधुकर देसाई, सरपंच राजन देसाई, चंद्रकांत परब, उपसरपंच संजय नाईक यांनी त्यांना सावंतवाडीत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बांदा वनपाल प्रमोद सावंत यांनी रुग्णालयात देसाई कुटुंबीयांची तातडीने भेट घेतली. जखमी राजेश देसाई यांच्या उपचारासाठी वनविभागाने तातडीची आर्थिक मदत करावी, अशी मागणी मधुकर देसाई यांनी केली आहे.दरम्यान, बांदा वनपाल प्रमोद सावंत यांनी तांबुळी, असनिये जंगलात पट्टेरी वाघाचा वावर असल्याचे सांगितले. सध्या काजू बागायती सफाई करण्याचे काम सुरू असून परिसरात वाघाच्या अस्तित्वामुळे ग्रामस्थांमध्ये  भीतीचे वातावरण आहे.