आवाडे येथील अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावरील अपघात
Edited by: संदीप देसाई
Published on: February 05, 2024 13:24 PM
views 886  views

दोडामार्ग : आवाडे येथे डंपरला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघातसोमवारी दुपारी आवाडे येथे झाला असून अपघातात जखमी झालेल्या दुचाकी स्वारास अधिक उपचारासाठी म्हापसा, गोवा येथील अजिलो रुग्णालयात हलविण्यात आले.

दुचाकीचालक दोडामार्ग-विजघर राज्यमार्गावरुन तिलारी ते दोडामार्गच्या दिशेने येत होते. तर अजून एक व्यक्ती दुचाकीच्या मागे बसली होती. आवाडे येथे दुचाकी आली असता या दुचाकीची व डंपरला धडक झाली. या अपघातात दुचाकी चालक हे जखमी होऊन बेशुद्ध पडले. यावेळी त्यांना शिवसेनेचे गोपाळ गवस यांसह अमित देसाई, इस्माईल चांद, रावसाहेब देसाई व युवकांनी खासगी गाडीतून साटेली-भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र चालक गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी म्हापसा येथील अजिलो रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेवर नियुक्त चालक वेळीच उपलब्ध नसल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. तर १०८ रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधल्यानंतर तब्बल २० मिनिटांनी रुग्णवाहिका आली व जखमी चालकास त्यांनतर अजिलो रुग्णालयात नेण्यात आले. इमर्जन्सी काळातही वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होत नसेल ही बाब खेदजनक असल्याची नाराजी उपस्थितांनी व्यक्त केली.