
सावंतवाडी : सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून वेगाने विकसित होत असून येथे पंचतारांकित हॉटेल्ससारख्या मोठ्या गुंतवणुकीला मोठी संधी आहे. आगामी काळात ताज, ओबेरॉयसारखी सुप्रसिद्ध हॉटेल्स येथे उभारली जाणार असल्याने जिल्ह्यातील युवकांसाठी हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये प्रचंड रोजगारसंधी तयार होणार आहेत, असे मत हॉटेल हायलंड सरोवर पोर्टिकोचे जनरल मॅनेजर सईद फैज नकवी यांनी व्यक्त केले.
मळगाव-सावंतवाडी येथील माई इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पारंपरिक ‘मेरी मिक्सअप ख्रिसमस केक मिक्सिंग सेरेमनी’ जल्लोषात पार पडली. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नकवी यांसह हॉटेल नोवोटेलचे एक्झिक्युटिव्ह शेफ दिनेश राणा, नोवोटेल गोव्याच्या लर्निंग अँड डेव्हलपमेंट मॅनेजर ममता नाईक, हिल्टन गोवा रिसॉर्टचे फूड अँड बेव्हरेज मॅनेजर धृव शर्मा, असिस्टंट रेस्टॉरंट मॅनेजर अखिलेश मोरे, शेफ विजय नागपाल, संपादक शेखर सामंत, लोकमान्य ट्रस्टचे संचालक सचिन मांजरेकर, प्राचार्य अनिरुद्ध दास, अमेय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
“विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल” — सईद नकवी : नकवी म्हणाले, “माई इन्स्टिट्युटने जिल्ह्याच्या पर्यटनक्षेत्राला नवे स्वरूप दिले आहे. विद्यार्थ्यांना पंचतारांकित हॉटेल्सच्या धर्तीवर प्रशिक्षण मिळत असल्याने त्यांना गोवा आणि इतर पर्यटनस्थळी सहज नोकरी मिळेल. प्रत्येक उपक्रमात मनापासून सहभागी व्हा; तुमचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे.”
“तुम्ही भाग्यवान आहात” — ममता नाईक : नाईक म्हणाल्या, “येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रत्यक्ष पंचतारांकित हॉटेल्समध्ये कामाचा अनुभव देत आहोत. तुम्ही शिक्षण पूर्ण करून बाहेर पडाल तेव्हा गोव्यातील मोठी हॉटेल्स तुम्हाला संधी देण्यासाठी तयार असतील.”
उपक्रम स्तुत्य — शेखर सामंत : सामंत म्हणाले की, पर्यटन जिल्ह्यात असे नावीन्यपूर्ण उपक्रम होत असल्याने विद्यार्थ्यांच्या करिअरला निश्चितच दिशा मिळेल.
प्राचार्य अनिरुद्ध दास म्हणाले, “विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी अशा विविध सेरेमनी आयोजित केल्या जातात. केक मिक्सिंग अनुभवाद्वारे विद्यार्थ्यांना मोठ्या कार्यक्रमांची हाताळणी शिकता येते. यातूनच विद्यार्थी पंचतारांकित हॉटेल्समध्ये सामावण्याच्या संधी उपलब्ध होतं असतात ”










