'पाक'चा झेंडा लपवल्याबद्दल पोलिसांकडे मोठी मागणी

सावंतवाडीत पोलिसांची शांतता बैठक
Edited by: विनायक गांवस
Published on: April 26, 2025 21:01 PM
views 33  views

सावंतवाडी : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात हिंदू संघटनांनी ठोकलेला पाकिस्तानी ध्वज लपवून ठेवत दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्याला जास्तीत जास्त कडक कारवाई करावी अशी मागणी सावंतवाडी येथील शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली. दरम्यान पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांनी सर्वांनी शांतता अबाधित ठेवावी असे आवाहन केले.


सावंतवाडी पोलीस ठाण्यात पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांच्या उपस्थितीत शांतता समितीची तातडीची बैठक झाली. यावेळी प्रभारी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, नगरपरिषद मुख्याधिकारी अश्विनी पाटील, उपनिरीक्षक संजय कातीवले उपस्थित होते.

 तसेच शांतता समितीचे सदस्य सिताराम गावडे, ऍड.नकुल पार्सेकर ,अभिमन्यू लोंढे,  विनायक रांगणेकर,हिदायतुल्ला खान,गोविंद गवंडे, तौकिर शेख,शब्बीर लांबे, चिन्मय रानडे, दिनेश गावडे, सुनील सावंत, गौरव शंकरदास ,रोहन धुरी ,उमेश सावंत, हरिचंद्र पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.सावंतवाडी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी खबरदारी घेताना सर्वांनी शांतता अबाधित ठेवण्याचे आवाहन पोलीस उपविभाग अधिकारी विनोद कांबळे यांनी केले. दरम्यान नगरपरिषद मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी फळ विक्रेते आणि रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांच्या बाबत आपण आढावा घेऊन शिस्त लावण्याचा प्रयत्न करणार आहे. जरूर तर एखादी बैठक घेतली जाईल असे त्यांनी सांगितले 

शांतता समितीच्या सदस्यांनी पहेलगाम मध्ये अतिरेक्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेला हल्ला निषेधार्थ आहे. हिंदू संघटनांनी ठोकलेला पाकिस्तानी ध्वज काढून नेऊन तो लपवून ठेवला यामागे संबंधित इसमाचा नेमका हेतू काय होता हे चौकशीत समोर यायला पाहिजे तसेच सावंतवाडी शहरांमध्ये नगरपरिषद च्या जागेमध्ये बसणारे फळ विक्रेते रस्ता अडवून बसतात किंवा एकाच विक्रेत्याच्या विविध ठिकाणी बसायला परवानगी दिली जाते. याबाबत आक्षेप घेतला. नगरपरिषदेच्या अशा भूमिकेमुळे शांततेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली जावी अशी मागणी केली. सावंतवाडी शहरांमध्ये वाहन पार्किंग वरून सध्या मोठा गोंधळ उडत आहेत त्यामुळे वाहतुकीची कोंडीही देखील होत आहेत असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

 दरम्यान नगरपालिका मुख्याधिकारी अश्विनी पाटील म्हणाल्या, सावंतवाडी शहरात संत गाडगेबाबा मंडईचे बांधकाम सुरू आहे त्यामुळे तेथे बसणारे विक्रेते आणि जवळपासची वाहने यांच्यामुळे जरा थोडी जागेची कमतरता भासत आहे तरी आपण फेर आढावा घेऊन विक्रेते सुस्थितीत कसे बसतील याची खबरदारी घेऊ, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.