BIG BREAKING | अपघात की घातपात? रामदास कदमांनी थेट घेतलं अनिल परबांचं नाव

घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 07, 2023 18:15 PM
views 259  views

मुंबई : शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा मुलगा आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला काल रात्री 11 च्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई हद्दीत अपघात झाला.

अपघातात सुदैवाने योगेश कदम सुखरुप आहेत. मात्र अपघातासंबंधी संशय व्यक्त केला जात आहे. रामदास कदम म्हणाले की, योगेश कदम यांच्या गाडीच्या मागे एक आणि पुढे एक पोलिसांची गाडी होती. तरीही नेमकी योगेश कदम यांच्याच गाडीला डंपरने धडक दिली. हे संशयास्पद असून घातपातची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रामदास कदम यांनी घातपाताचा संशय व्यक्त करतांना थेट अनिल परबांचं नाव घेतलं. ते म्हणाले की, अनिल परब यांच्यासारख्या लोकांनी योगेश कदम यांना राजकारणातून संपण्याचा अनेकदा प्रयत्न केलेला आहे. आता त्यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होता काय? असा संशय निर्माण होतोय. ज्यांनी यापूर्वी योगेशदादांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरच संशय असल्याचं रामदास कदम म्हणाले.

अपघातानंतर सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

आमदार योगेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे. या अपघातानंतर धडक देणारा ट्रकर पलटी झाला. त्यानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. त्यामुळे हा घातपात असल्याचे बोलले जात आहे.