
सावंतवाडी : राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली या पथकाने साऊथ कोकण डिस्टीलरीजवळ अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह 7 लाख 58 हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी नाका इन्सुली पथकाने मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार साऊथ कोकण डिस्टीलरीजवळ, इन्सुली सावंतवाडी रोड येथे संशयीत वाहनांची तपासणी करीत असताना मारुती सुझुकी कंपनीचे पांढऱ्या रंगाचे स्वीफ्ट चारचाकी वाहन क्र. MH-07-Q-8685 या वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे एकुण 45 कागदी पुठ्ठयाचे बॉक्स (900 सिलबंद बाटल्या) अवैध मद्यसाठा मिळून आला.
या प्रकरणी वाहन चालक नामे- गोपाळ सुरेश गावडे, वय 36 वर्षे, रा. घर नं-1115, नेनेवाडी, चौकुळ, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यामध्ये रु.2 लक्ष 58 हजार किंमतीचे मद्य व रु. 5 लक्ष किंमतीचे चारचाकी वाहन असा एकुण रु. 7 लाख 58 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई प्रदीप रास्कर, दुय्यम निरीक्षक, तानाजी पाटील, दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक, दिपक वायदंडे, जवान यांनी केली. या प्रकरणी पुढील तपास तानाजी पाटील, दुय्यम निरीक्षक तपासणी नाका इन्सुली हे करीत आहेत.