कसाल हायस्कूलमधील १०० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उपक्रम संपन्न
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 02, 2026 22:29 PM
views 113  views

कसाल : कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या कसाल हायस्कूलमधील १०० गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना आज शिंदे सेनेचे कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. शिंदे सेनेचे नवी मुंबईचे पदाधिकारी आणि नगरसेवक किशोर पाटकर यांच्या विश्वस्त संस्थेच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.

नगरसेवक किशोर पाटकर यांच्या विश्वस्त संस्थेच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना सायकली भेट दिल्या जातात. विशेष म्हणजे, पाटकर हे स्वतः किंवा त्यांच्या विश्वस्त मंडळाचे कोणतेही सदस्य प्रसिद्धीपासून दूर राहून हे कार्य करतात. आजच्या कार्यक्रमालाही पाटकर कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते, मात्र त्यांच्या या दातृत्वाचा विशेष उल्लेख आमदार निलेश राणे यांनी आपल्या भाषणात केला.

यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले की, "पाटकर यांनी दाखवलेला हा दातृत्वपणा कौतुकास्पद आहे. मी खासदार असताना देखील या शाळेला मदत केली होती आणि त्यावेळी आयोजित कार्यक्रमाला मी माझ्या मातोश्रींसह उपस्थित होतो, याची मला आजही आठवण आहे. भविष्यातही या संस्थेला किंवा शाळेला जी काही मदत लागेल, ती निश्चितपणे केली जाईल."

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक उत्तम माळगावकर सर यांनी केले, ज्यात त्यांनी शाळेच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर सावंत आणि इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला खालील मान्यवर उपस्थित होते:

प्रभाकर सावंत (अध्यक्ष, कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था)

भाई सावंत (उपाध्यक्ष)

अवधूत मालणकर (विश्वस्त)

दादा साईल (सचिव व जि. प. उपाध्यक्ष)

दीपलक्ष्मी पडते, सुप्रिया वालावलकर (जि. प. सदस्या)

मिलिंद नाईक (कुडाळ पंचायत समिती सभापती)

नवीन बांदेकर (शालेय समिती अध्यक्ष)

राजन परब (कसाल सरपंच), शंकर परब (उपसरपंच)

काका कुडाळकर (जि. प. माजी अध्यक्ष)

संजय पडते आणि अन्य पदाधिकारी.

आमदार निलेश राणे यांचे आगमन होताच लाभार्थी विद्यार्थ्यांनी फुलांचे गुच्छ देऊन त्यांचे जंगी स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी आमदारांनी सर्व १०० विद्यार्थ्यांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.