भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा पदवीदान समारंभ उत्साहात

Edited by:
Published on: May 05, 2025 19:53 PM
views 17  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा पदवीदान समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शंभरपेक्षा जास्त भावी फार्मासिस्टना त्यांची पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीतील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.मिलिंद खानोलकर आणि प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ.राजेश नवांगुळ उपस्थित होते. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ.रमण बाणे व यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.विजय जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्राचार्य डॉ.जगताप यांनी आपल्या प्रास्ताविकात कॉलेजचा शैक्षणिक आलेख मांडत विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. सोबतच शिक्षक आणि पालकांच्या योगदानाचाही उल्लेख केला.

डॉ. राजेश नवांगुळ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना यशस्वी व्यावसायिक जीवनासाठी समर्पण, कठोर परिश्रम आणि सततच्या अध्ययनाची गरज यावर जोर दिला. डॉ.मिलिंद खानोलकर यांनी यश मिळवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट वापरू नका असे आवाहन केले. प्रामाणिक मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचा कानमंत्रही दिला. अच्युत सावंतभोसले यांनी संस्थेच्या ध्येयधोरणांची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी शिक्षण व आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी संस्था कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चारही केला.या दीक्षांत समारंभात बी.फार्मसीचे शंभरहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे पालक सहभागी झाले होते. मान्यवरांच्या हस्ते सर्व पदवीधारकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हा क्षण मोठ्या अभिमानाने साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी फार्मासिस्ट पदाच्या कर्तव्याची शपथसुद्धा घेतली. कार्यक्रमाचे निवेदन नमिता भोसले तर आभार प्रदर्शन प्रणाली जोशी यांनी केले.