
चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील मासरंग वरचीवाडी येथील ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या मागणीचा विचार करत साकवाच्या (कॉजवे) कामाचा भूमिपूजन समारंभ गुुरुवार २ जानेवारी रोजी मोठ्या जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण करताना आमदार शेखर निकम यांनी या साकवासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे रु.२० लाख रु. नीधी मंजूर करून घेतले, ज्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी आणि ग्रामस्थांना येणाऱ्या समस्यांना कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे.
आमदार शेखर निकम म्हणाले, "ग्रामस्थांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामे करणे ही माझी प्राथमिकता आहे. मासरंग वरचीवाडी साकवाचे काम पूर्ण झाल्यावर येथील जनतेला मोठा लाभ होईल आणि ग्रामस्थांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होईल. हे काम मंजूर करून घेतल्याबद्दल मासरंग वरचीवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले. या साकवामुळे दळणवळण सुलभ होईल, शेतकरी, विद्यार्थी, आणि स्थानिक रहिवाशांसाठी दैनंदिन जीवनात आमुलाग्र बदल होत आहे.त्यामुळे ग्रामस्थामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.