दुसऱ्याच्या ताटावर ताव मारणे ही भाजपची संस्कृती : यशवंत परब

वेंगुर्ल्यात मंजूर बीएसएनएल टॉवरचे भूमिपूजन
Edited by: दिपेश परब
Published on: December 09, 2023 19:04 PM
views 215  views

वेंगुर्ला : दुसऱ्याच्या ताटावर ताव मारणे ही भाजपचीच संस्कृती व वाढलेले ताट आमचेच आहे यासाठी अगोदरच गुपचुप जाऊन आयत जेवणे समर्थकांचा निर्लज्जपणा असल्याची जोरदार टीका उबाठा सेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी केली आहे. 

   वेंगुर्ला तालुक्यात खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून २३ बीएसएनएलचे टॉवर मंजूर झाले असून काल ८ डिसेंबर रोजी शुक्रवारी खासदार यांच्या हस्ते बीएसएनएलचे अधिकारी ठेकेदार व गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार हे भाजप राणे समर्थक यांना समजल्यावर त्यांनी स्वतःचाच उदो उदो करून घेण्यासाठी नारळ फोडले. खासदार विनायक राऊत यांनी गावातील लोकांच्या मागणीनुसार वेळोवेळी संसदेत टॉवर मंजुरीसाठी मागणी केली तसेच संबंधित मंत्री महोदयांना पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून तालुक्यात जवळपास २३ टॉवर मंजूर करून घेतले त्यामुळे याचे सर्वस्वी श्रेय खासदार राऊत यांनाच आहे. टॉवर मंजुरीसाठी कुठलाही पत्रव्यवहार न करता किंवा संसदेत एक चकार शब्दही न काढता नारायण राणे यांनी टॉवरला मंजुरी दिली अस भासवण्याचं काम भाजप, राणे समर्थक करत असून त्यांची आयत्या बिळावरची व दुसऱ्याच्या ताटातला उष्ट खायची सवय पडून गेलेली आहे. अशी जोरदार टीका यशवंत परब यांनी करत  ₹नारायण राणेंनी केलेल्या एकातरी टॉवरच्या मागणीचा पुरावा सादर करावा असे आव्हान दिले आहे.

  दरम्यान खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते वेंगुर्ला तालुक्यातील चीपी, कर्लीवाडी, परुळेबाजार, कुशेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, मेढा श्रीरामवाडी, वायंगणी-  हरिचरणगिरी, दाभोली, खानोली, वेतोरे, मोचेमाड, सागरतिर्थ टाक, शिरोडा- केरवाडा या गावातील टॉवरचे भूमिपूजन केले. पुढील आठवड्यात उर्वरित गावातील टॉवरचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे बाळू परब यांनी सांगितले. 

  यावेळी बीएसएनएलचे अधिकारी शशांक श्रीवास्तव, ठेकेदार भरत, शिवसेना उपनेते तथा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपनेते तथा महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, तालुका संपर्कप्रमुख भालचंद्र चिपकर, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, शहर प्रमुख अजित राऊळ, उपतालुकाप्रमुख मनोहर येरम, विभाग प्रमुख संदीप पेडणेकर, वायंगणी सरपंच अवि दुतोंडकर, उपविभाग प्रमुख निलेश परुळेकर, आदी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक व त्या त्या गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.