वैभव नाईक करतायत मंजूर न झालेल्या कामांची भूमिपूजनं !

अरविंद करलकरांचे आरोप
Edited by: भरत केसरकर
Published on: March 06, 2024 12:01 PM
views 467  views

कुडाळ : आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत घावनळे रामेश्वर मंदिर ते खुटवळवाडी रस्त्यासाठी ३ कोटी ५४ लाख रु. मंजूर झाल्याचे सांगून काल भूमिपूजन करून कामाचा शुभारंभ केला. त्याचबरोबर नेरूर वाघोसेवाडी रस्ता ग्रा. मा. ३५६ खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी २ कोटी ३९ लाख  रु. मंजूर करण्यात आल्याचे सांगून या कामाचा देखील  शुभारंभ वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. पण ह्या दोन्ही कामांच्या निविदाच झालेल्या नसून आमदार वैभव नाईक हे केवळ भूमिपूजन करून नौटंकी करत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे कुडाळ तालुकाप्रमुख अरविंद करलकर यांनी केला आहे. कुडाळ शिवसेना कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

     महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून हे रस्ते मंजूर करून घेतले असल्याचे आमदार वैभव नाईक सांगून खोटे बोलत आहेत. याबाबतची माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्याशी भेटून माहिती घेतली आणि माहिती घेतली असता एकुण 80 कामे असून 64 कामे प्रतिक्षेत आहेत. तर 16 कामे जी मंजूर आहेत ती दोडामार्ग, वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुक्यातील आहेत. त्यामुळे ही कामे मंजूर झाल्याचा दावा करीत आहेत ते खोटे असून वैभव नाईक हे दिशाभूल करत असल्याचा दावा अरविंद करलकर यांनी केला आहे.

रस्त्याची कामे मंजुरच नाहीत मग भूमिपूजन करता कसली? असा सवाल उपस्थित करून वैभव नाईक यांनी आमनेसामने येण्याचे खुले आव्हान करलकर यांनी दिले आहे. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते रत्नाकर जोशी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, महिला आघाडी तालुका प्रमुख दीक्षा सावंत, महिला आघाडी उपतालुका प्रमुख अनघा रांगणेकर, शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख योगेश तुळसकर, युवासेना तालुका प्रमुख प्रसाद नार्वेकर, आदित्य राणे, विभागप्रमुख जयदीप तुळसकर, उपविभागप्रमुख रामचंद्र गडकरी, धर्मा सावंत, दर्शन इब्रामपूरकर आदी उपस्थित होते.