दोडामार्गात उद्या कोट्यवधींच्या विकासकामांची भूमिपूजने

मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: संदीप देसाई
Published on: March 09, 2024 15:01 PM
views 87  views

दोडामार्ग :  सावंतवाडी विधानसभा मतदार संघ आणि संपूर्ण जिल्ह्यात विकासाचा झंझावात आणणाऱ्या शिंदे सरकारच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असणारी विकास कामे वेगाने पूर्ण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे सरकार मधील प्रमुख नेते असलेले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग तालुक्यात कोट्यवधी रक्कमेच्या मंजूर असलेल्या प्रमुख विकास कामांची भूमिपूजने उद्या रविवारी त्यांच्याच हस्ते होणार आहेत. 


दोडामार्ग तालुक्यात एका टोकाला असणाऱ्या केंद्रे येथे हत्ती प्रतिबंधासाठी चर खोदाई करण्यात आली होती. मात्र या कामांमुळे पावसात मातीचे ढीग रस्त्यावर येऊन वाहतूक विस्कळीत व्हायची. शिवाय पूरपरिस्थिती ही निर्माण व्हायची. त्यामुळे या ठीकाणी नवीन पुल बांधण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत होती. त्याच बरोबर हेवाळे येथील पुल व्हावे यासाठी गेली अनेक वर्षे ग्रामस्थांची मागणी होती. या ठिकाणच्या कमी उंचीच्या पुलामुळे ग्रामस्थ वाहून जात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या ठिकाणी पुल व्हावे ही मागणी सातत्याने जोर धरत होती. मात्र मोठा निधी आवश्यक होता. यात विशेष लक्ष घालून नामदार केसरकर यांच्या प्रयत्नातून निधी प्राप्त झाल्यामुळे या पुलाचे काम पूर्ण झाले असून त्या कामाचे ही लोकार्पणही होणार आहे. तसेच पाळये येथे २०१९ च्या पावसात कोजवे वाहून गेला होता. त्याठिकाणी कोजावे उभारण्याची मागणी सातत्याने ग्रामस्थांमधून होत होती. याकामी सुद्धा नामदार केसरकर यांच्या प्रयत्नांतून मोठा निधी प्राप्त झाला आहे. याच बरोबर तालुक्यातील महत्वाची विकास कामांचेही आज भूमिपूजने होणार आहेत. 


'त्या' कामांसाठी कोट्यवधीचा निधी !

मुळस - हेवाळे रस्त्यावर नदीवर हेवाळे ब्रिजचा लोकार्पण सोहळा ( रक्कम ५ कोटी ५० लक्ष रुपये ), तिलारी रामघाट रस्त्यावर केंद्रे पुनर्वसन येथील पुलाचे भूमिपूजन ( रक्कम १ कोटी ५० लक्ष रुपये ), 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तळकट - कोलझर नदीवर पुलाचे भूमिपूजन ( रक्कम २ कोटी ४१ लक्ष रुपये ), शिवाय अन्य गावातीलही विकास कामांचे  भूमिपूजन करण्यात येणार आहे.

कुडाळ मध्येही होणार भूमिपूजने

राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या प्रादेशिक पर्यटन योजना सन 2023 - 24 अंतर्गत कोचरा श्री गुरुदेव मंदिर परिसर व दत्त मंदिर जेटी परिसर पर्यटन दृष्ट्या सुशोभीकरण करणे ( १ कोटी रुपये ), राज्य शासनाच्या अंतर्गत अर्थसंकल्पीय बजेट निधी मार्च 2023 कोचरा येथे कुडाळ - पिंगळी - म्हापण - कोचरे श्रीरामवाडी बंदर रस्ता संरक्षक भिंत बांधणे ( १ कोटी ५० लक्ष रुपये ), राज्य शासनाच्या कोकण आपत्ती योजना कोचरा भटवाडी येथील चौधरी घराच्या ठिकाणी दरड प्रतिबंधक संरक्षक उपाययोजना करणे ( रक्कम १ कोटी ५५ लक्ष ) यांची होणार आहेत. तरी या कार्यक्रमास सावंतवाडी - दोडामार्ग - वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघातील शिवसेना - भाजप व राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी केले आहे.