कवी सफरअली इसफ यांना भूमी काव्य पुरस्कार जाहीर

समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर प्रमुख कार्यवाह सुरेश बिले यांची माहित
Edited by:
Published on: October 14, 2024 10:19 AM
views 228  views

कणकवली : समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कवी सफरअली इसफ यांच्या दर्या प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या 'अल्लाह ईश्वर' या आजच्या मराठी कवितेतील बहुचर्चित काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये, स्मृतीचिन्ह शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून नामवंत समीक्षक प्रा.डॉ.रणधीर शिंदे यांच्या परीक्षणातून सदर पुरस्कारची निवड करण्यात आली असल्याची माहिती समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि प्रमुख कार्यवाह सुरेश बिले यांनी दिली.

समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी उत्कृष्ट काव्यसंग्रहाला सातारा येथील प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यासाठी ग्रंथ मागविले जात नाहीत मात्र अगदी वेगळी कविता लिहिणाऱ्या कवीची स्वतंत्रपणे निवड केली जाते. यावर्षी या पुरस्कारासाठी गेल्या काही वर्षात धर्माचं ध्रुवीकरण चालू असल्याच्या पार्श्वभूमीवर लिहिल्या गेलेल्या 'अल्लाह ईश्वर' या अतिशय वेगळ्या कविता असणाऱ्या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली. बदलते तीव्र सामाजिक भान आणि समाजामधील सर्व भेद विसरून माणूस म्हणून एकत्र राहण्याचे करण्यात येणारे आवाहन ,कविता सपाटीकरण होत जाणाऱ्या या काळात अशी भावना कवितेतून व्यक्त होणे हे या कवितेचे बलस्थान आहे. त्यामुळे भूमी काव्य पुरस्कारासाठी अल्लाह ईश्वर काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. या संग्रहाला ज्येष्ठ अभ्यासक चंद्रकांत वानखडे यांची दीर्घ प्रस्तावना लाभली असून त्यात ते म्हणतात,कवीने वेदना भोगली, अन्याय अत्याचाराला तो सामोरा गेला,दु:ख, दारिद्रयाचे त्याने चटके सोसले, पदोपदी देशभक्ती सिध्द करण्याच्या यातना सहन केल्या तरीही त्याचा चांगुलपणावरचा  विश्वास अबाधित आहे. घृणा, तिरस्कार, उपेक्षा,राग, द्वेषच त्याच्या वाट्याला आली असतांना देखील त्याने प्रेमाची कास सोडली नाही.निराश होत नाही उलट पुरेपूर आशावाद त्याने जपला.  या सगळ्या पार्श्वभूमीवर भूमी काव्य पुरस्काराचे महत्त्व अधोरेखित होत आहे. असेही मातोंडकर आणि बिले यांनी सांगितले.