
देवगड : दीक्षित फाऊंडेशन यांच्या मार्फत वाडा येथील अनंत कृष्ण केळकर हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय कीर्तीप्राप्त ‘भेरा’ हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. या शो चे आयोजन स्थानीय समिती व शाला समितीमार्फत करण्यात आले होते. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक श्री.श्रीकांत प्रभाकर, मुख्य भूमिका असलेला देवगड सुपुत्र दीपक जोईल, अभिनेते व प्रशालेचे माजी विद्यार्थी प्रमोद कोयंडे, शाला समिती अध्यक्षहर्षद जोशी, स्थानीय समिती अध्यक्ष शांताराम पुजारे, स्थानीय समिती कोषाध्यक्ष सतीश रुमडे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
कोकणातील एका दिव्यांग मुलाचे भावविश्व विद्यार्थ्यांना समजावे, अभिनय कसा असावा यासाठी या चित्रपटाच्या शो चे आयोजन प्रशालेच्या वतीने करण्यात आले होते. चित्रपट दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर यांनी आयोजकांचे विशेष आभार मानत शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष अभिनय कार्यशाळा घेण्याचा मानस व्यक्त केला. तसेच दीक्षित फाऊंडेशनचेही आभार त्यांनी मानले. मोठ्या पडद्यावर चित्रपट दाखवण्याचा हा अनोखा प्रयत्न यशस्वी करण्यासाठी हर्षद जोशी यांनी विशेष मेहनत घेतली. पालक वर्गामधून अशा उपक्रमांबाबत समाधान व्यक्त होत आहे. यावेळी हर्षद जोशी, कु.स्वरा हजारे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आकाश तांबे, दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर, कलाकार प्रमोद कोयंडे यांनी मनोगते व्यक्त केली तर आभार प्रदर्शन सौ.स्मिता तेली यांनी केले.