
कुडाळ : शिवसेना ठाकरे गट व भाजप यांच्यात तणाव निर्माण होईल, तसेच माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांच्याविरोधात बदनामीकारक, प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आमदार भास्कर जाधव यांना कुडाळ दिवाणी न्यायालयाने निर्दोष मुक्तता दिली.
या प्रकरणाची माहिती अशी की, १८ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी कुडाळ–मालवण मतदारसंघाचे तत्कालीन आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेल्या कथित चुकीच्या चौकशीच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन केले होते. त्यानंतर कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय नजिक आयोजित सभेमध्ये गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविषयी बदनामीकारक तसेच दोन पक्षांमध्ये दंगे घडवून आणण्याच्या उद्देशाने चिथावणीखोर वक्तव्ये केल्याची तक्रार तुकाराम साईल यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात दाखल केली होती.
या तक्रारीनुसार आ.भास्कर जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. संशयितांच्यावतीने अॅड. हितेश कुडाळकर व अॅड. केळकर यांनी युक्तिवाद पेश केला. त्यांच्या युक्तिवादास मान्यता देत दिवाणी न्यायाधीश जि. ए. कुलकर्णी यांनी गुरुवारी आ. भास्कर जाधव यांची निर्दोष मुक्तता घोषित केली.










