
रत्नागिरी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यभर धामधूम आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या राळी सुरु झालेल्या आहेत. रत्नागिरी जिल्हाही या धामधुमीत मागे नाही. याचाच एक भाग असलेल्या गुहागर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे माजी आमदार डॉ.विनय नातू यांनी शिवसेना - उद्धव ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांच्यावर मात करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. विनय नातू यांनी, गुहागर विधानसभा मतदारसंघातील पंधरागाव खाडीपट्टा विभागात गावभेट कार्यक्रमादरम्यान, भास्कर जाधव यांना, ''पंधरा वर्षात आमदार म्हणून काय केले ?'' असा सवाल केला आहे.
यावेळी विनय नातू म्हणाले की, '' करोडोंचा विकास केला'' असे सांगणारे साधा धरणाच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. तळवटपाल धरणाच्या पाणी कालव्याचा प्रश्न वर्षभरात मार्गी लावू असे सांगीतले होते. मग पंधरा वर्षात का झाले नाही? या मतदारसंघात आमदार म्हणून गेली पंधरा वर्षे काय करत होतात ? असा सवाल ही त्यांनी भास्कर जाधव यांना केला आहे.
स्वार्थापोटी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतल्याची टीका
भास्कर जाधवांवर टीका करताना, डॉ. विनय नातू पुढे म्हणाले की, सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा- कमळ आणि शिवसेना- धनुष्यबाण वेगवेगळे लढले, त्यामुळे राष्ट्रवादी चे घड्याळ निवडून आले. सन २०१९ ला ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले. शरद पवारांनी राष्ट्रवादीत पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासह विविध पदे त्यांना दिली. पण केवळ स्वार्थासाठी त्यांनी सन २०१९ ला राष्ट्रवादीतून शिवसेनेत उडी मारून धनुष्यबाण हाती घेतले. म्हणजे केवळ आपल्या स्वार्थासाठी घड्याळ चिन्ह सोडून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढविली आणि निवडून आले. हा मतदारसंघ केवळ आपल्या फायद्यासाठी वापरुन स्वतः चा विकास करुन घेतला. मतदार मात्र आजही उपेक्षितच आहे. अशी बोचरी टीकाही त्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर केली.
दरम्यान, गुहागर विधानसभेची जागा ही शिवसैनिकच लढवेल असे वक्तव्य शिवसेना नेते आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी. नुकतेचे चिपळूण येथील पत्रकार परिषदेत केले आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून भाजपकडून माजी आमदार विनय नातू यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र महायुतीचा गुहागर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. हा निर्णय शिवसेनानेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अजित पवार आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस असे महायुतीचे नेते एकत्रित घेतील आणि महायुतीत सर्वांनीच एकत्रित काम करायचे आहे, असे विनय नातू सांगत आहेत. जिल्ह्य़ातील
गुहागर हा भाजपाचा पारंपारिक बालेकिल्ला राहिला आहे. मात्र 2009 नंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी विनय नातू सरसावले आहेत. महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ जरी शिवसेना शिंदे गटाकडे गेला तरी नातूंना विश्वासात घेतल्याशिवाय या ठिकाणी महायुतीचा उमेदवार ठरवता येणार नाही. असे स्पष्ट संकेत नातू यांनी दिले आहेत.










