भरारी पथक ॲक्शन मोडवर

बांद्यात वाहनांची कसून तपासणी
Edited by: संदीप देसाई
Published on: October 22, 2024 13:57 PM
views 16  views

सिंधुदुर्गनगरी :  आदर्श आचारसंहिता सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातील भरारी पथके ॲक्शन मोडवर काम करीत आहेत. जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी स्वत: आज बांदा चेक पोस्ट येथे भेट देऊन वाहनांची कसून तपासणी केली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोज शेवरे हे देखील उपस्थित होते.

जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सर्व नोडल अधिकारी, विभाग प्रमुखांची बैठक घेऊन विशेषत: भरारी पथकांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या होत्या. जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. शिवाय तपासणी करत असताना  सामान्य नागरिक आणि पर्यटकांना कोणताही त्रास होणार नाही याचीही दक्षता घेण्याच्या सूचना केल्या होत्या. बांदा चेक पोस्टवर गोवा बनावटीची दारु, नियमबाह्य रोकड याची वाहतूक होऊ नये, याबाबत वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.  त्यानुसार श्री पाटील यांनी  बांदा चेक पोस्ट येथील तपासणी नाक्यावर भेट दिली. तपासणी नाक्यावर कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत ते करत असलेल्या कामाची पाहणी केली.  तसेच गोव्याकडून जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी देखील केली.