
दोडामार्ग : तिलारी घाटात रस्त्याला मोठे भगदाड पडल्याची घटना आज शनिवारी घडली आहे. अरुंद असलेल्या घाटाच्या वळणावरच भगदाड पडल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे भगदाड तातडीने बुजवण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांना जोडण्याऱ्या तिलारी घाटातील रस्त्यांची पाच वर्षांपूर्वी दुरूस्ती झाली होती. त्यानंतर झालेल्या पहिल्याच अतिवृष्टीमुळे या घाटातील तीन ठिकाणी रस्ता खचला होता व घाट वाहतुकीस पूर्णतः बंद झाला होता. पावसाळा संपताच चंदगड सार्वजनिक बांधकाम उपविभागाने खचलेल्या घाट रस्त्याची दुरूस्ती केली होती. त्यानंतर सुदैवाने या घटनांची पुनरावृत्ती झाली नव्हती. ८ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा तिलारी घाटातील एका ठिकाणी डोंगराचा काही भाग कोसळल्याची घटना घडली होती. यावेळी मातीसह मोठे दगड रस्त्यावर आले. परिणामी हा घात रस्ता आवाजड वाहतुकीस बंद केला होता ही घटना ताजी असताना घाटातील एका ठिकाणी रस्त्याला मोठे भगदाड पडल्याचे समोर आले आहे. अरुंद रस्त्याला भगदाड पडल्यामुळे वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. खोल दरी असलेल्या या घाटात भगदाडामुळे अपघात झाल्यास चालकासह प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे घाटातील वाहनांची वर्दळ लक्षात घेता हे भगदाड तातडीने बुजविण्याची मागणी होत आहे.