
कुडाळ : आमची महायुतीची तयारी आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भगवा फडकवणार आहोत. कार्यकर्त्यांनी कुठल्याही शक्तीला बळी पडू नका. कोण आलं तर सांगा आमची महाशक्ती आहे. दिग्गज नेते आपल्याकडे आहेत. त्यामुळे येथील 15 जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समितीवर आपले वर्चस्व राहील असा निर्धार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कुडाळ येथील शिवसेना मेळाव्यात केला.
पहिल्या टर्म मधील जे आमदार आहेत, त्यातील उजवं काम कोणाचं असेल तर ते आमदार निलेश राणे यांचं. आज शिवसेना वाढत आहे. आता जरी साडे आठ हजाराच्या मताधिक्याने निवडून आला असला तरी 2029 च्या विधानसभा निवडणुकीत तुमच्या समोरच्या उमेदवारचं डिपॉझीट जप्त होईल. आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. ते जो उमेदवार देतील तो मोठ्या मताधिक्याने निवडून आणा. उपमुखमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी त्यांना महायुती की स्वबळावर लढायचं याचा निर्णय ते घेतील. ते जो आदेश देतील त्याप्रमाणे काम करून यश मिळवणार हा शब्द त्यांना द्या. माझी आवश्यकता असेल तर 50 जिल्हा परिषद मतदार संघात मी प्रचाराला येणार. दिवसातून 2 तास जरी शिवसनेसाठी दिलेत तरी समोरच्याच डिपॉजिट जाईल. एकेमेकांच्या गावातील वातावरण बघू नका तर स्वतःच्या मतदार् संघात कार्यकर्त्यांनी काम करायला हवे.
सर्वात जास्त पक्षप्रवेश होत असतील तर जो शिवसेनेत होत आहेत. ज्या वेळी कार्यकर्त्याला अडचण येते त्यावेळी तुमचे आमदार निलेश राणे तुमच्या सोबत असतात. एकनाथ शिंदे युतीचा काय आदेश देतील त्याप्रमाणे काम करायला हवे. एकतर्फी आपण शिवसेनेचा भगवा फडकवू शकतो. तिकीट वाटपाची जबाबदारी आमची नाही. तिकीट देण्याचा निर्णय वरिष्ट नेते घेतील त्यामुळे कोणाला शब्द देऊ नका असं उदय सामंत यांनी सांगितले.
आतून काम करणाऱ्यांना आतच राहू द्या :
निवडणुका आली की इच्छुकांची संख्या वाढते. दौऱ्यात गेलो की हार वाढतात. आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी मागतात. एवढे दिवस कुठे असता असं विचारलं तर सांगतात विधानसभेला आतून काम केलेलं. हे आतून काम करणाऱ्यांपासून सावध राहा. त्यांना आतच ठेवा. आत राहून काय करतील याचा नेम नाही. त्यामुळे जे बाहेर आहेत त्यांनाच उमेदवारी द्या असं उदय सामंत यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.










