
दोडामार्ग : तिलारी घाटातून गोव्याकडे गोमांस तस्करी करणाऱ्यांचा स्थानिकांनी पर्दाफाश केल्या नंतर 15 लाख किमतीचे 10 टन गोमांस जप्त करत एकूण 26 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संशयित सय्यद इस्माईल सय्यद अलाउद्दीन मिरचोणी ( 48 ) रा पेढामेल केपे ( दक्षिण गोवा) व अमोल विद्याधर मोहनदास ( 40 ) रा. सह्याद्री नगर बेळगाव यांच्यावर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे चंदगड पोलिसांनी सांगितले.
तिलारी घाटातून अवजड वाहनांसह एसटी वाहतूकिला बंदी आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटाच्या माथ्यावर तसेच पायथ्याशी स्थिर सर्वेक्षण पथकाचे तपासणी नाके आहेत. बेळगाव ते गोवा अशी गोमांस तस्करी करणारा एक अवजड ट्रक घाटमाथ्यावरील तपासणी नाका ओलांडून तिलारी घाट उतरत होता. दरम्यान ट्रकात अचानक बिघाड झाल्याने तो बंद पडला. घाटात अवजड वाहन कसे आले? याचा जाब विचारण्यासाठी स्थानिक आले त्यावेळी स्थानिकांनी चांगलाच विषय उचलून पोलिसांना धारेवर धरले होते. त्यावेळी गोमांस तस्करी करणाऱ्यांचे बिंग फुटले.
ट्रकात मोठ्या प्रमाणात गोमांस असल्याची बातमी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बेळगाव व गोवा राज्यात पसरताच गोरक्षकांनी तिलारी घाटाकडे धाव घेतली. गोमांस तस्करी करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी या गोरक्षकांनी लावून धरली. पोलीस, वन विभाग व फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली व त्यांची कार्यवाही सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. गोमांस तस्करी करणाऱ्या संशयित सय्यद इस्माईल सय्यद अलाउद्दीन मिरचोणी व अमोल विद्याधर मोहनदास या दोघांवर चंदगड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३२५, ३(५) व महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९७६ कलम ५ (क), ९(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच १५ लाख रुपये किंमतीचे सुमारे १० टन गोमांस, ७ लाख रुपये किमतींचा टाटा (१२१२) ट्रक व ४ लाख रुपये किमतीची सुझुकी एसप्रेसो कार जप्त केली. अधिक तपास शितल धवीले करत आहे.