डिजिटल साक्षर व्हा : डॉ. अक्षय पाठक

Edited by: मनोज पवार
Published on: August 07, 2025 16:06 PM
views 31  views

सावर्डे : आजच्या डिजिटल काळात साक्षर लोकांमध्ये सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून मोबाईल, संगणक, इंटरनेट व इतर डिजिटल माध्यमांतून होणारी सायबर गुन्हेगारी रोखायची असेल तर लोकांनी  त्या संदर्भात  सतर्कता बाळगण्याची परिणामी सुशिक्षित बनण्याची गरज आहे असे प्रतिपादन डॉ.अक्षय फाटक( ज्योतिषशास्त्र ) यांनी केले. कला व विज्ञान महाविद्यालय सावर्डे व बी. एस. सी.आयटी. यांच्या संयुक्त एन.एस.एस विभागाच्या वतीने आयोजित 'सायबर गुन्हेगारी व सुरक्षा' या विषयावरती ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य टी.वाय कांबळे यांनी डॉ.अक्षय पाठक  यांचे  शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सायबर सुरक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.फाटक पुढे म्हणाले, आज या सोशल माध्यमांमधून बनावट ईमेल किंवा मेसेज पाठवून पासवर्ड चोरी, दुसऱ्याचे नाव व फोटो वापरून फेक खाते बनवणे, दुसऱ्याला ब्लॅकमिलिंग करून धमकी देणे, समाजात संभ्रम निर्माण करणारे मॅसेज प्रसारित करणे, अश्लील व्हिडिओ, आणि ऑनलाईन फसवणूक यासारखे सर्रास प्रकार घडत आहेत. त्यामुळे लोकांनी वरील भूलप्रकारांना बळी न पडता  याबाबतीत सजग राहून सोशल माध्यमांचा वापर आपल्या गरजेपुरता केला तरच आपण सायबर गुन्हेगारीला आळा घालू शकतो.

आपल्या प्रास्ताविकामध्ये  महाविद्यालयाचे प्राचार्य टी. वाय कांबळे यांनी उपस्थितांना प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. आणि पुढे ते म्हणाले, डिजिटल माध्यमांद्वारे होणाऱ्या सायबर गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी लोकांमध्ये आणि तरुण पिढीमध्ये  जागरूकता आणण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी या कार्यक्रमाला बी. एस.आय.सी.टी. चे प्राचार्य एकनाथ गावडे, प्रा. वाघचौरे मॅडम, डॉ. दिप्ती शेंबेकर, प्रा. जयसिंग चवरे प्रा.पुजा आवले, प्रा. अवनी कदम याबरोबरच इतर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा.सुनिल जावीर यांनी केले तर आभार डॉ. दिप्ती शेंबेकर यांनी मानले.