
वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषद, युवक शरीर सौष्ठव संवर्धन संस्था, श्री सातेरी व्यायामशाळा, वेंगुर्ला व सोन्सूरकर फिटनेस शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला व सुदृढ वेंगुर्ला' या संकल्पनेच्या अनुषंगाने आज रविवारी (२ फेब्रुवारी) सकाळी जलबांदेश्वर, वेंगुर्ला येथे विशेष "बीच वर्कआउट इव्हेंट" आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाची सुरुवात मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्ती व जल पूजनाने करण्यात आली. यानंतर उपस्थित नागरिकांसाठी योगा व व्यायाम सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रशिक्षक म्हणून फिटनेस प्रशिक्षक किशोर सोन्सुरकर, योगशिक्षक बाबली गवंडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थितांना समुद्रकिनारी व्यायाम करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. प्रशिक्षकांनी योगासने, स्ट्रेचिंग, कार्डिओ, क्रॉसफीट इत्यादी व्यायाम प्रकारांची प्रात्यक्षिके उपस्थितांकडून शिस्तबद्ध पद्धतीने करून घेतली.
या शिबिरास निवासी उपजिल्हाधिकारी श्री.सुकटे, लायन्स क्लब वेंगुर्ल्याच्या अध्यक्षा पल्लवी कामत, ऊर्मिला सावंत, मृण्मयी कारेकर हेमा गावस्कर, श्री सातेरी व्यायामशाळा संचालिका अबोली किशोर सोन्सूरकर, प्रशिक्षक अंकित किशोर सोन्सूरकर यांच्या सहित वेंगुर्ल्यातील नागरिक, व्यायाम पट्टू व वेंगुर्ला नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विविध वयोगटातील पुरुष व महिलांनी यात भाग घेतला व समुद्रकिनाऱ्यावर तंदुरुस्ती वाढवण्यासाठी व्यायाम सत्रात सक्रिय सहभाग घेतला. या अनोख्या उपक्रमामुळे वेंगुर्ला शहरात आरोग्य व स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे. यासोबतच बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या एन सी सी कॅडेट्स यांनी नवाबाग समुद्रकिनारी स्वच्छता उपक्रम राबविला व वर्गीकृत स्वरूपात कचरा संकलित केला.
या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सोन्सूरकर व त्यांच्या संपूर्ण टीम चे या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल कौतुक व आभार व्यक्त केले व असे उपक्रम नियमितपणे राबिवले जाण्याचे महत्त्व पटवून दिले. नागरिकांनी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहनही केले. तसेच अशा उपक्रमांमुळे शहरातील नागरिकांमध्ये शरीरसंपदा व मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल व समाजात एकत्रितपणे आरोग्यासाठी काम करण्याची जाणीव निर्माण होईल, ज्यामुळे वेंगुर्ला अधिक सुंदर आणि सुदृढ बनेल अशी भावना व्यक्त केली.