
सावंतवाडी : गणेशोत्सव काळात कोकणात वेगवेगळ्या पारंपरिक पद्धती पाहायला मिळतात. सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील बारा-पाच अर्थात गांवकर कुटुंबिय एकत्रित रित्या येऊन गणेशाचे पूजन करुन गेल्या अनेक वर्षाची सुरू असलेली परंपरा आजही जपत आहेत. दरवर्षी भव्यदिव्य गणेशमुर्ती सोनुर्लीतच नव्हे तर पंचक्रोशी व सावंतवाडी तालुक्यातही आकर्षण ठरते. एकत्र कुटुंब पद्धती काळाच्या ओघात लोप पावत असताना सोनुर्ली येथील गावकर कुटुुंबियांनी मात्र ही परंपरा राखली आहे. सोनुर्ली येथील बारा पाच गावकर कुटुुंबिय खुप मोठे आहे. शेकडो जणांच हे कुटुंब आहे. या कुटुंबाचा मानाचा गणपती सोनुर्लीतील श्रद्धास्थान आहे. या गणपतीची 9 फूट उंचीची गणेशमुर्ती आकर्षण असते. गणेश मुर्ती घडविण्याबरोबरच रंगकाम परंपरेप्रमाणे गावकर कुंटुबियांकडूनच केले जाते. यानंतर एकत्रितरित्या गणेशचतुर्थीदिवशी महापुजेने या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. या मुर्तीसाठी खास मुंबईतून चाकरमानी गणेश भक्त दागिने, सजावटीचे साहित्य घेऊन गावी दाखल होतात. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही मुर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मूर्तीच्या रंग कामापासून सजावटीमध्ये बऱ्याच बारकाव्याने काम केले जात असल्याने ही मूर्ती सोनुर्ली सह पंचक्रोशीमध्ये आकर्षणाचा विषय ठरते. गावामध्ये गणपती समोर आरती देखावे सादर केले जातात. सावंतवाडी शहरासह सोनुर्ली गावातील हलते देखावे हा चर्चेचा विषय असायचा. या गावात आजही असे देखावे पहायला मिळतात. बारा पाच कुटुंबीय दरवर्षी आपल्या गणरायाची सेवा भक्ती भावाने करत असतात. दरदिवशी
सर्व कुटुंबियांकडून या मुर्तीची पुजा, नैवेद्य नित्यनियमाने केली जाते. नैवैद्याला पूर्ण हॉल देखील कमी पडतो. वरसलीप्रमाणे मुख्य पुजेचा मान एका एका कुटुुंबाला दिला जातो. सर्व कुटुंबात शिजविलेला महाप्रसाद महाआरतीनंतर एकत्रित अर्पण केला जातो. यानंतर सर्वांचे सहभोजन होते. मानाच्या या बारा पाच गणपतीला जिल्हाभरातुन भाविक तसेच राजकीय सामाजिक पुढारी दरवर्षी भेटी देतात. या गणपतीसमोर सालाबादप्रमाणे दहाव्या दिवशी सत्यनारायण पूजा संपन्न होते. यानंतर अनंत चतुदर्शीला विधिवत धुमधडाक्यात मुर्तीचे विसर्जन केले जाते.बारा पाच कुंटुबियांचा गणेशोत्सव म्हणजे लहान थोरांच्या आनंदाला पार नसतो.
सोनुर्लीतील बारापाच कुटुंब अकरा दिवस मनोभावे आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा करतात. यामध्ये कुठल्याही प्रकारची कमी नसते. दररोज भजने, फुगड्या, आरत्या आदी कार्यक्रम केले जातात. तर अकराव्या दिवशी मिरवणुकीने व फटाक्याच्या आतषबाजीत बाप्पाला निरोप दिला जातो. ही विसर्जन मिरवणूकही भरगच्च असते. फटाक्यांची आतषबाजी लक्षवेधी असते.