संशयास्पद व्यवहारांवर बँकांचे राहणार लक्ष !

जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांच्या सूचना !
Edited by: देवयानी वरसकर
Published on: March 19, 2024 14:37 PM
views 154  views

 सिंधुदुर्गनगरी : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. आचारसंहिता कालावधीत सर्वं बँकांनी संशयास्पद व्यवहारावर लक्ष ठेवावे. एखाद्या खात्यातून संशयास्‍पद व्‍यवहार होत असल्यास त्‍याची माहिती जिल्‍हास्‍तरीय खर्च नियंत्रण समितीस दयावी. कोणताही निर्णय बॅंकांनी त्यांच्या स्‍तरावर घेवू नये असे निर्देश जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हादंडाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अध्‍यक्षतेखाली लोकसभा सार्वत्रिक  निवडणूक 2024 च्‍या अनुषंगाने जिल्‍हाधिकारी कार्यालयात जिल्‍हयातील सर्व बॅंक अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पेालिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी बालाजी शेवाळे, एलडीएम श्री मेश्राम आदी उपस्थित होते.

श्री तावडे म्हणाले सर्व बॅंकाच्‍या जिल्‍हा समन्‍वयक यांनी जिल्‍हयातील आपल्‍या बॅंकाच्‍या सर्व शाखांकडून एकत्रि‍त करुन जिल्‍हा अग्रणी बॅंक व्‍यवस्‍थापक यांच्याकडे सादा करावी व जिल्‍हा अग्रणी बॅंक व्‍यवस्‍थापक यांनी ती माहिती सहायक खर्च निरीक्षक यांना सादर करावी, दिनांक 1 जानेवारी 2024 पासून बॅं‍क खात्‍यामध्‍ये 1 लाख रुपये भरले गेले असतील अथवा काढले गेले असतील तर अशी खाते निश्चित करावीत व त्‍याबाबत खात्री करावी, निवडणूक खर्चाचे अनुषंगाने सर्व प्रकारच्‍या (UPI, RTGS, NEFT) पैसे काढणे व पैसे भरणे व्‍यवहारांबाबत जिल्‍हास्‍तरीय निवडणूक खर्च नियंत्रण समितीस अवगत करावे, एकाच व्‍यक्‍तीचे RTGS चे प्रमाण वाढलेले असल्‍यास त्‍याबाबत माहिती दयावी, E-SMS मध्‍ये दिलेल्‍या सूचनांचे पालन करावे. QR Code स्‍कॅन करावा व आवश्‍यक ती कार्यवाही करावी, बॅंकाच्‍या नियमित व्‍यवहारांवर कोणतीही बंधने नाहीत. बॅंकांनी ही माहिती सादर करीत असताना सर्वसामान्‍य ग्राहकांना त्रास अथवा अडथळा होणार नाही याची काळजी घ्‍यावी असेही ते म्हणाले.

 पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांनी Electoral Offence मधील माहिती तात्‍काळ पोलिसांनी देण्यात यावी व त्‍यामध्‍ये काही अडचण असल्‍यास पोलिसांशी संपर्क साधावा असे यावेळी सूचित केले.