बांदा इथल्या व्ही. एन. नाबर प्रशालेत क्रीडा दिन उत्साहात

ब्लू हाऊस गट ठरला या वर्षीचा विजेता !
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 21, 2022 16:54 PM
views 160  views

बांदा : श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या येथील व्ही. एन. नाबर प्रशालेत शालेय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी अनेक सांघिक, वैयक्तिक खेळात सहभाग घेऊन आपले क्रीडा कौशल्य दाखवून दिले.

     या क्रीडा दिनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नूतन विद्यालय कळणे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक संजय तायवाडे तसेच शिक्षक पालक संघाच्या सदस्या सौ रेश्मा सावंत, मधुरा शिरोडकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ मनाली देसाई, उपमुख्याध्यापिका सौ शिल्पा कोरगावकर आदि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वतीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्रीफळ वाढवून व क्रीडा मशाल प्रज्वलीत करून मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी झुंबा, फ्लॉवर ड्रिल, रिंग, डंबेल एक्सरसाईज, सारी ड्रिल, एरोबिक, शिव तांडव आदि कलाकृती सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

     दुसर्‍या दिवसीय पारितोषिक वितरण समारंभास मोपा गावचे माजी सैनिक कृष्णा परब प्रमुख अतिथी लाभले. आजच्या मोबाईलच्या जगतात यंत्रांना जरासे बाजूला ठेवून सुदृढ राहण्यासाठी खेळ आवश्यक आहेत. खेळाने माणसाचे शरीर व मन दोन्ही तंदुरुस्त राहतात. नेहमी भरपूर खेळा असे विचार अध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांनी व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. एकूण सर्व खेळांचे गुणांकन केल्यावर या वर्षीचा विजेता ब्लू हाऊस गट ठरला.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिशा रॉड्रिग्ज, स्नेहा नाईक यांनी केले तर प्रशांत देसाई यांनी आभार मानले.