महापूराची नुकसानभरपाई बांदा व्यापाऱ्यांना-शेतकऱ्यांना त्वरित मिळावी

भाजपा युवा मोर्चाचे सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सदस्य गौरांग शेर्लेकर यांची मागणी
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 13, 2022 19:53 PM
views 183  views

बांदा : बांदा शहरात २०१९ व २०२१ मध्ये आलेल्या महापुरात नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाई देण्यात आली नाही. शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे व्यापारी वर्गात तीव्र नाराजी असून याबाबत शासनाने तात्काळ भरपाई अदा करावी. नुकसानग्रस्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा भाजपा युवा मोर्चाचे सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सदस्य गौरांग शेर्लेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.

   त्यांनी म्हटले आहे की, बांदा शहरात दोनवेळा महापूर आल्याने यामध्ये व्यापारी वर्गाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. २०१९ मधील महापुरात नुकसान झालेले १९१ व्यापारी बांधव भरपाई पासून वंचित आहेत. २०२१ मधील महापुरात देखील कित्येक व्यापारी हे नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत भरपाईची रक्कम मिळण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र शासनाने नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. त्यानंतर तालुक्यात चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची भरपाई देखील शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही.

   शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून याबाबत शासनाने तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा व्यापाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे असा इशारा श्री शेर्लेकर यांनी पत्रकातून दिला आहे.