
सावंतवाडी : तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी उद्या रविवारी १८ डिसेंबर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रचार तोफा थंडावल्या तरी कंदिल प्रचारावर उमेदवारांचा भर आहे. बांदा, माजगाव, माडखोल, कारिवडे, मडूरा, , नेमळे, चराठे, वेत्ये, न्हावेली, निरवडे, तिरोडा,भालावल या ग्रामपंचायत सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ठरत असून या ठिकाणी काटेकी टक्कर होत आहे.
बांद्यात भाजपच्या प्रियांका नाईक विरूद्ध शहर विकासच्या अर्चना पांगम अशी थेट लढत होत असून या दोघांसह स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठेची ही लढत होत आहे. तर माजगावमध्ये युतीच्या डॉ. अर्चना सावंत विरूद्ध महाविकासच्या संजना सावंत अशी सावंत विरूद्ध सावंत लढत होत आहे. दोघांनीही आपली संपूर्ण ताकद लावली असून मविआ नेते विकास सावंत, विक्रांत सावंत, चंद्रकांत कासार भाजप नेते संजू परब, रेश्मा सावंत, बाबू सावंत यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. तर माडखोलमध्ये भाजप समोर गाव विकास पॅनलनं कडव आव्हान उभ केल असून कारीवडे, कुणकेरीत भाजप व बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात फुट पडून स्वतंत्र पॅनल उभी आहेत.
भाजप नेते महेश सारंग यांच्या कोलगाव मतदारसंघात कारिवडे, कुणकेर, आंबेगाव या ग्रामपंचायत लढत होत असून शिंदे गटासह, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझांसाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर चराठ्यात पंचरंगी लढत होत आहे. नेमळे, न्हावेली, निरवडे, ओटवणे सोनुर्लीतही काटेकी टक्कर पहायला मिळते आहे. एकंदरीतच २० डिसेंबरला गुलाल कुणाचा ? हे स्पष्ट होणार असून सध्यस्थितीत भाजप- बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व कॉग्रेस नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.