बांदा उड्डाणपूलाचे काम शिवसेनेने पाडलं बंद

Edited by: विनायक गावस
Published on: June 26, 2023 20:16 PM
views 134  views

सावंतवाडी : स्थानिकांना विश्वासात न घेता मुळ आराखड्यात बदल करुन सुरु असलेले बांदा उड्डाणपूलाचे काम सेना शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी आक्षेप घेत बंद पाडले. उड्डाणपूल कामाला आमचा विरोध नसून स्थानिकांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी महामार्ग अधिकारी, ठेकेदार, ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी साई काणेकर यांनी केली आहे.

बांदा उड्डाणपूलाच्या कामास गेल्या सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. सध्या महामार्गावर पिलर टाकण्यासाठी खोदाई सुरु करण्यात आली आहे. याबाबत स्थानिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ग्रा. पं. सदस्य साईप्रसाद काणेकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख भैय्या गोवेकर, नितेश पेडणेकर, हेमंत दाभोलकर, मिलिंद सावंत यांनी घटनास्थळी येत ठेकेदाराला जाब विचारला. उड्डाणपूलाचा बदललेला आराखडा स्थानिक प्रशासनाला न देता तसेच स्थानिकांना विश्वासात न घेता कोणाच्या परवानगीने काम सुरु केले असा सवाल उपस्थित केला.

बदललेल्या आराखड्यानुसार पिलरची संख्या, पाणी निचाऱ्याचे व्यवस्थापन, बाजूपट्टीकडे वाहणाऱ्या नाल्याचे नियोजन याबाबत स्थानिकांना कोणतीच कल्पना देण्यात न आल्याने काणेकर यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबतचा आराखडा सरपंच यांना दिल्याचे ठेकेदार यांनी सांगितले. यावर काणेकर आक्रमक होत याबाबत संयुक्त बैठक तत्काळ घेण्याची मागणी केली. तसेच जोपर्यंत बैठक घेऊन स्थानिकांच्या समस्यांचे निराकरण होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा दिला.