
बांदा : बांदा शहर हे एक वेगळंच ऊर्जा देणारे शहर आहे. गेली वीस पंचवीस वर्षे या शहराशी, येथील युवकांशी, सामाजिक, सांस्कृतिक मंडळाशी माझे जवळचे ऋणानुबंध निर्माण झाले. याचं बांद्याने मला दिल, दोस्ती आणि दुनियादारी शिकवलीय. या बांदा गावचा मी आजन्म ऋणी राहीन असे प्रतिपादन दोडामार्ग तालुक्यातील प्रसिद्ध युवा उद्योजक, युवा नेते तथा सिनेस्टार दत्ताराम बाबा टोपले यांनी बांदा येथे केले.
सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ कट्टा कॉर्नर यांच्या आषाढ महोत्सव निमित्त आयोजित 'भानुमती स्वयंवर या संयुक्त दशावतार नाट्य प्रयोगाच्या उदघाटन प्रसंगी बाबा टोपले बोलत होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना बाबा टोपले यांनी आपल्या जीवनात बांदा गावाचे किती महत्वाचे स्थान आहे हे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी व्यासपीठावर माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, बांदा उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर, ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत, माजी उपसभापती विनायक दळवी, उद्योजक भाऊ वळंजू, माजी सरपंच बाळा आकेरकर, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, उद्योजक आनंद गवस, संजय नाईक, सुवर्णकार आपा चिंदरकर आदी उपस्थित होते.
युवानेते दत्ताराम उर्फ बाबा टोपले यांचा सन्मान
या कार्यक्रमात उद्योजक तथा युवानेते बाबा टोपले यांचा उद्योजक भाऊ वळंजू यांच्याहस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी बाबा टोपले यांनी या मंडळाचे सर्वच उपक्रम अतिशय दर्जेदार व वाखाणण्याजोगे असतात. या मंडळाने मला दिलेल्या सन्मानाबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन असे प्रतिपादन करत मंडळाचे आभार मानले.