
वेंगुर्ले : तालुक्यातील वायंगणी समुद्र किनार पट्टीवर काही प्रमाणात “पिवळसर मळकट रंगाचा पदार्थ” असलेले गोळे दिसून आले असून याबाबत वेंगुर्ले पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच त्या पदार्थां बाबत पुढील कारवाई सुरू केली आहे.
वायंगणी येथील सागर रक्षक सुहास तोरसकर यांना हे गोळे आज सकाळी किनाऱ्यावर दिसून आले. त्यांनी सदर गोळे संशयास्पद वाटल्याने वेंगुर्ले पोलीस आणि वनविभाग यांना कळविले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि माहिती घेतली. सदर पदार्थ बिगर वासाचा, मऊ, आणि वेस्ट मटरेल असल्याचे आढळून येत आहे. हा पदार्थ मोडला असल्यास आतमधून पांढऱ्या रंगाचा पदार्थ येत आहे. तर उन्हात ठेवल्यास तो विरघळत असल्याचे पोलिसांनी सांगितले याबाबत हा पदार्थ अधिक तपासासाठी लॅब ला पाठवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सांगितले आहे.