
प्रवेश करताच तालुका प्रवक्तेपदाची धुरा
कुडाळ : तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिंदे शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते बाळकृष्ण उर्फ बाळा पावसकर यांनी पुन्हा एकदा 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी आमदार तथा शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
दोन वर्षांपूर्वी बाळा पावसकर यांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. मात्र, तिथे काम करत असताना पुन्हा एकदा आपल्या मूळ पक्षात परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आज अधिकृतपणे त्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश करून 'स्वगृही' परतणे पसंत केले. पक्षप्रवेशासोबतच त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांची ठाकरे सेनेच्या कुडाळ तालुका प्रवक्तेपदी तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे.
"पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या ध्येयधोरणांवर आणि नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवूनच मी आज पुन्हा एकदा शिवसेनेत (उबाठा) जाहीर प्रवेश केला आहे. आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी काम करेन," असा विश्वास बाळा पावसकर यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी बाळा पावसकर यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी राजकीय प्रवासासाठी व नवीन पदासाठी शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशामुळे कुडाळ तालुक्यातील ठाकरे सेनेची ताकद आणखी वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या सोहळ्याला तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










