बाल शिवाजीच्या विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमात साजरं केलं रक्षाबंधन..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 30, 2023 12:22 PM
views 322  views

कणकवली : अनिरुध्द शिक्षण प्रसारक संस्था मुंबईच्या बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, कणकवलीच्या इयत्ता 1 ली व 2 रीच्या विद्यार्थ्यांनी असलदे येथील स्वस्तिक फाउंडेशनच्या "दिविजा वृध्दाश्रमला" भेट देऊन आणि वृद्ध आजी आजोबांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे करत सामाजिक बांधिलकी जपली. हा उपक्रम राबविण्याकरिता, स्वस्तिक फाउंडेशन दीविजा वृध्दाश्रमचे सेक्रेटरी श्री संदेश शेट्ये तसेच अस्मी राणे, अश्विनी पटकारे, सायली तांबे आणि इतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. 

उपक्रमाची सुरुवात प्रशाळेतील मुलींनी रक्षाबंधन साजरे करून केली. तदनंतर वृद्धाश्रमातील आजोबांनी मुलांना आशीर्वाद म्हणून मुलांसाठी दोन गाणी गायली. तरी प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी गाणी ,प्रार्थना व भक्तीगीते गाऊन वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची शाबासकी मिळवली. विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दातून रक्षाबंधनाचे महत्त्व सांगण्याचे प्रयत्न केले आणि वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी देखील त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी मुलांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. आजी-आजोबांकडून आशीर्वाद घेऊन पाणवलेल्या डोळ्यांनी मुलांनी वृद्धाश्रमाचा निरोप घेतला.

सदर उपक्रम अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेच्या सेक्रेटरी सौ. सुलेखा राणे, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका गीतांजली कुलकर्णी, शिक्षकवर्ग श्रीपाद बाणे, रामचंद्र पाचंगे, नेहा जामसंडेकर, प्रेरणा चिंदरकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.