मृत्यूस कारणीभूत ठरतील अशा दुखापती केल्याप्रकरणी संशयीताला सशर्त जामीन

संशयिताच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 03, 2025 13:17 PM
views 299  views

देवगड : वैयक्तिक वैमनस्यातून कटरद्वारे सुर्यकांत चंद्रकांत शेडगे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरतील अशा गंभीर दुखापती करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवगड तालुक्यातील जामसंडे तरवाडी येथील दिपक भास्कर शेडगे याला देवगडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. बी. घाटगे यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजुर केला आहे. संशयिताच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

फिर्यादी व आरोपी हे एकाच ठिकाणचे रहिवासी आहेत. फिर्यादीचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्यासाठी लागणारे साहित्य तो आरोपीच्या घराकडे जाण्याच्या वाटेवर ठेवतो, या कारणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दोघांमध्ये वाकडीक आहे. दि ७ मे २०२५ रोजी सकाळी ८.३० वा. च्या सुमारास फिर्यादी श्रीराम टेडर्स जामसंडे येथे साहित्य खरेदी करत असताना आरोपी तेथे आला व त्याने माझ्या घराकडील वाटेवरून फेब्रीकेशनचे साहित्य न्यायचे नाही, असे सांगितले. त्यावरून दोघांमध्ये झटापट झाली. आरोपीने खिशातून कटर काढत फिर्यादीच्या छातीवर, काखेजबळ, उजव्या बाहुबर, डाव्या गालावर, डोळ्याजवळ, कपाळावर अशा एकूण सहा गंभीर जखमा केल्या. त्यानंतर फिर्यादीला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.

याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार आरोपीवर मा.न्या.सं. ११८ (२), ३५२, ३५१ (२), ३५१ (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तर आरोपीने दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादीविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत होता. आरोपीच्यावतीने जामिनासाठी दाखल अर्जाबर सुनावणी होत न्यायालयाने ५० हजारांचा जामिन मंजूर करताना सरकारपक्षाच्या पुराव्यात अडथळा करू नये, फिर्यादीशी संपर्क साधू नये व तारखांना न्यायालयात हजर राहण्याच्च्या अटी घातल्या आहेत.