
चिपळूण : बहुजन ओबीसी समाजाचे राजकीय अस्तित्व सध्या संपुष्टात येत आहे. कोणताही पक्ष निवडणुकीमध्ये बहुजन ओबीसी समाजाला उमेदवारी देत नाही. फक्त राजकारणामध्ये त्यांचा वापर करून घेत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन ओबीसी समाजात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. आता घराणे शाही बंद करून बहुजन ओबीसी समाजातील नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली, असे मत जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व अर्थ सभापती, आणि ओबीसी कुणबी समाज नेते सहदेव बेटकर यांनी व्यक्त केले.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता मागील अनेक वर्षे जिल्ह्यात ओबीसी उमेदवार होते. त्यावेळी कोणत्याही सेवा सुविधा नव्हत्या. तरी ओबीसी उमेदवार निवडून आले होते. मात्र बदलत्या काळानुसार सेवा सुविधा वाढल्या. शिक्षणाची दारे खुली झाली. पण समाज राजकीय पटलावर दिसत नाही. याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे बहुजन ओबीसी समाज राजकीय दृष्ट्या सत्तेतून हद्दपार होत आहे.
गेली अनेक वर्ष कोणताही पक्ष लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये बहुजन ओबीसी समाजाला उमेदवारीच देत नाही. मात्र त्यांच्या मताचा वापर करून स्वतःच सत्तेचे राजकारण करतात . बहुजन ओबीसी समाजाला फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये सदस्य पदासाठी त्यांना उमेदवारी दिली तर दिली अशीच स्थिती असते. मात्र कोणत्याही मुख्य पदावरती विचार केला जात नाही. त्यामुळे आता सर्व समाज याचा गांभीर्याने विचार करू लागला आहे
नुकतीच विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीमध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मध्ये उमेदवार दिले जाणार आहेत. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने बहुजन ओबीसी समाज आहे . या समाजाला पाच विधानसभांपैकी किमान दोन विधानसभेत तरी महाविकास आघाडी अथवा महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी मिळावी अशी त्यांनी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली आहे. तरच बहुजन ओबीसी समाजाचे राजकीय अस्तित्व टिकून राहील. अन्यथा ते संपुष्टात येऊ शकते. बहुजन ओबीसी समाजातील महिलांना सध्या काही नेते आणि पुढारी देवदर्शन आणि साड्यांचे वाटप करून राजकीय गणिते जुळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, महिलांना फक्त साड्या देऊन त्यांचा संसार फुलणारं नाही. त्यांचा संसार उभा करण्यासाठी हे राजकीय पुढारी काय करतात. हे पण लक्षात घेण्याची आता गरज आहे. नुसता दिखावा करणारे पुढारी जनतेची दिशाभूल करीत आहेत. मात्र तरुणाच्या हाताला काम देणे आणि रोजगार उपलब्ध करणे यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता बहुजन ओबीसी समाज आपल्या न्याय हक्कांसाठी निश्चित सजग झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
जो पक्ष बहुजन ओबीसींचा विचार करणार त्यांना उमेदवारी देईल त्याच्या पाठीमागे सर्व शक्ती उभी करू. अन्यथा मतदार राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवू शकतात असं परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे.
---16.10.2024-----