लाखो रुपयांच्या दागिन्यासहित बॅग लंपास..!

Edited by:
Published on: March 24, 2024 15:06 PM
views 69  views

दोडामार्ग : आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पुणे येथून आलेल्या एका जोडप्याची बॅग लाखो रुपयांच्या दागिन्यासहित लंपास करण्याचा प्रकार रविवारी दोडामार्ग बाजारपेठमध्ये घडला. ऐन आठवडा बाजार दिवशी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याने शहरात एक प्रकारे खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी कानावर हात ठेवण्याचा प्रकार केला आहे. आपल्याकडे अर्ज दखल आहे मात्र अद्याप गुन्हा दखल नसल्याची माहिती पोलिसांकडून उशिरा देण्यात आलीय.

याबाबत अधिक माहिती अशी की, होळी सणाच्या अनुषंगाने दोडामार्ग तालुक्यातील आपल्या मूळ गावी पुणे येथून नवरा - बायको दांपत्य आज दुचाकीने आले होते. सुरुवातीला ते दोडामार्ग बाजारपेठेत आले. दोडामार्ग - कोल्हापूर रोडवरील एका सुपर मार्केट समोर त्यांनी आपली दुचाकी पार्क केली व दोघेही खरेदीसाठी त्या सुपरमार्केट मध्ये गेली. मात्र जाताना ते आपली सॅक बॅग दुचाकीवरच ठेऊन गेली. साधारणतः दहा ते पंधरा मिनिटांनंतर खरेदी होताच पैसे नेण्यासाठी ते नवरा बायको दुचाकी जवळ आले असता सदर बॅग गायब झाल्याची त्यांच्या लक्षात आले. त्या बॅग मध्ये लाखो रुपये किंमतीची दागिने व रोकड होती असे त्या दाम्पत्याच म्हणणे आहे. बॅग गायब झाल्याचे लक्षात येताच नवरा बायकोची अक्षरशः गाळण उडाली. त्यांनी सुपर मार्केटच्या परिसरात व सीसीटिव्हीद्वारे बॅग व चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात यश मिळू शकले नाही. याबाबत सदर दांपत्याने दोडामार्ग पोलिसांशी संपर्क साधला असून सायंकाळी उशिरा पर्यंत कार्यवाही सुरू होती. मात्र त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.