
दोडामार्ग : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या टीकेवरून सिंधुदुर्गातील राजकारणात नव्या वादळाला सुरुवात झालीय. “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडे उमेदवारच नाहीत,” या नितेश राणे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी तीव्र शब्दांत पलटवार केला आहे.
धुरी म्हणाले, “आम्ही आणि आमचे कार्यकर्ते पूर्णपणे तयार आहोत. निवडणुकीसाठी सज्ज असलेली आमची संघटना आणि आमचे कार्यकर्ते जनतेच्या मनात आहेत. तुम्ही त्याची काळजी करू नका.”
ते पुढे म्हणाले, “फक्त प्रसिद्धीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नाव घेतात, पण प्रत्यक्षात आपल्या मित्रपक्ष शिंदे गटालाच सुरुंग लावतात आणि भाजपमध्ये प्रवेश देतात. त्या कार्यकर्त्यांशी आमचा काहीही संबंध नाही. अशा राजकीय खेळांवर जनता उत्तर देईल.” “येत्या निवडणुकीत जनता कोण कुठे उभी आहे हे दाखवून देईल. उगाच वावटळ उठवायची आणि प्रत्यक्षात काहीच नाही असे प्रकार आता संपले पाहिजेत. जनतेचा विश्वास आमची खरी ताकद आहे. त्यामुळे “शिवसेना (उबाठा) चा भगवा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निश्चितपणे फडकेल असा आत्मविश्वास धुरी यांनी व्यक्त केलाय.