
सावंतवाडी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या काळात समता प्रस्थापित करण्यासाठी नक्कीच गरजेचे आहेत. सर्व भारतीयांना राज्यघटनेने समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांनी एकत्र बांधून ठेवण्याचे महान कार्य बाबासाहेबांच्या हातून घडले आहे. बाबासाहेब हे युगपुरुष आहेत, असे प्रतिपादन सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथे समाज मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात श्री. गावडे बोलत होते.
प्रारंभी जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, माजी नगराध्यक्ष उमाकांत वारंग, विलास जाधव, सुंदर गावडे, अभय पंडित, ॲड. अनिल निरवडेकर, प्रा. रुपेश पाटील यांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर जमलेल्या सर्व आंबेडकरप्रेमी बांधवांना सीताराम गावडे व उपस्थितांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील आंबेडकरी विचारांवर कार्य करणारे विविध समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.