
...तर भाजपला मिळेल मोठी ताकद
सावंतवाडी : सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना भारतीय जनता पक्षाने ऑफर देत आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रयत्न सुरू केलेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीच श्री. साळगावकर यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याच वृत्त सुत्रांनी दिलय. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांसह मित्र पक्षाला शह देण्यासाठी ही खेळी भाजप करत असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. श्री. साळगावकर यांच्या रूपाने एक स्वच्छ, निष्कलंक चेहरा भाजपला मिळू शकतो.
मात्र, श्री. साळगावकर यांनी अद्याप यावर कोणतही भाष्य केलं नाही आहे. त्यांच मौनच बरंच काही सांगून जात आहे. बाळासाहेब ठाकरेंचा एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून सावंतवाडी त्यांनी शहरात उत्कृष्ट काम केले. ८ वर्ष ते या शहराचे नगराध्यक्ष होते. दोनवेळा नगराध्यक्ष राहिले असून थेट नगराध्यक्ष म्हणून ते जनतेच्या मतांतून विजयी झाले होते. नगराध्यक्षपदाच्या काळात त्यांनी शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यापूर्वी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलेय. ९० च्या दशकात शिवसेनेकडून आमदारकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा होती. मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर ते राजकीय क्षेत्रात अलिप्त होते. मात्र, सामाजिक कार्यात ते सक्रिय होते. त्यांच्या माध्यमातून भाजपला एक स्वच्छ प्रतिमेचा, निष्कलंक अन् निर्भिड असा चेहरा मिळू शकतो.
सावंतवाडी न.प.वर भाजपची सत्ता आणण्यासाठी शहरात एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपला अनुभवी चेहरा हवा आहे. त्यामुळे भाजप साळगावकर यांना पक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात शहरात माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांचे वर्चस्व आहे. त्यांना आव्हान देण्यासाठी भाजपला श्री. साळगावकर यांसारखा एक सक्षम चेहरा हवा आहे. यादृष्टीने त्यांना श्री. साळगावकर यांना भाजपात आणण्यासाठी दस्तुरखुद्द भाजप प्रदेशाध्यक्षाच अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.










