सा.बां.चे अधिकारी मस्तवाल, मंत्र्यांच्या प्रवासी मार्गांतच खड्डे !

फौजदारी गुन्हे दाखल करा : माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
Edited by: विनायक गावस
Published on: December 13, 2023 15:54 PM
views 228  views

सावंतवाडी : आंबोली-सावंतवाडी रस्त्याचं काम सुरू असताना अभियंतांच दुर्लक्ष झाल्यानेच या रस्त्यावर खड्डे पडून अपघात झालेत आहेत. दरवर्षीच हा रस्ता खराब होतो. या खड्डयांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी व लोकांच्या अपघात, मृत्यूस कारणीभूत ठरल्यानं फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली. पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना याबाबतचे निवेदन त्यांनी दिले.


माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह माजी नगरसेवकांनी आज पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची भेट घेत याबाबतच निवेदन दिलं. बांधकामच्या अधिकाऱ्यांच्या व अभियंतांच्या दुर्लक्षामुळे हे रस्ते निष्कृष्ट दर्जाचे होत आहेत. रस्त्यातील भ्रष्टाचारात अधिकारी व ठेकेदार यांच्यात संगनमत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची व त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, तसेच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह माजी नगरसेवकांनी केली. श्री साळगावकर यांनी आज सावंतवाडी पोलीस ठाण्यावर माजी नगरसेवकांसोबत धडक देत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.


आंबोली घाट-सावंतवाडी रस्त्याचं काम सुरू होत त्यावेळी अभियंतांनी लक्ष देण्याची गरज होती. परंतु इथं दुर्लक्ष केल्यामुळे हे काम निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे. तसेच आंबोली घाटातून मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते त्यामुळे रस्त्याचं काम सुरू असताना लक्ष देण्याची गरज होती. परंतु तसं न झाल्याने आज नाहक त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. दरवर्षी हा रस्ता खराब होतो. यामुळे अपघातांच प्रमाण वाढून लोकांचे नाहक बळी जात आहेत. एवढंच नाही तर ज्या मार्गाने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रविंद्र चव्हाण प्रवास करतात त्याच रस्त्यावर भ्रष्टाचार करण्याची हिंमत हे अधिकारी करत आहेत. यावरूनच हे अधिकारी किती मस्तावलेत हे दिसून येते. त्यामुळे तात्काळ संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी बबन साळगावकर यांनी केली. तर गुन्हे दाखल न झाल्यास आपण जिल्हा न्यायालयात धाव  घेऊ असा इशारा देखील श्री. साळगावकर यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान याबाबत आपण बांधकाम विभागाला लेखी स्वरुपात पत्र देऊन जबाब घेऊ तर तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करू असे आश्वासन पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी माजी नगराध्यक्षांना दिले. दरम्यान , साळगावकर यांनी येथील शहरात आठवड्या भरपूर घडलेल्या खुना प्रकरणात जलद गतीने तपास करून आरोपीला गजाआड केल्याबद्दल श्री. अधिकारी यांचा सत्कार केला.


यावेळी माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, माजी नगरसेवक सुरेश भोगटे,माजी नगरसेवक विलास जाधव, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, सिताराम गावडे, बंटी माठेकर ,रवी जाधव, सुधीर पराडकर, अभय पंडित, प्रदीप ढोरे, आसिफ बिजली, मनोज घाटकर, तौकीर शेख, संदीप नाईक आदी उपस्थित होते.